उन्हामुळे बाजारातील भाज्यांची आवक घटली
नवी मुंबई-: वाशीतील एपीएमसी घाऊक भाजीपाला बाजारात उन्हाळा सुरू होताच भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून पारा वाढत चालल्याने तीव्र उष्णता जाणवत आहे. काहींना उष्मघाताचा परिणाम होत आहे. तसेच भाजीपाल्यालाही कडक उन्हाचा फटका बसत आहे. त्यामुळे बाजारात भाज्यांची १०% ते १५%आवक कमी झाली आहे..त्याचा परिणाम दरांवर झाला असून दरात वाढ झाली आहे.
कडक उन्हामुळे होणारे भाज्यांचे उत्पादन घटते, त्यामुळे बाजारात भाज्यांची कमी आवक होते. परिणामी मागणी जास्त आणि पुरवठा कमी होत असल्याने दरवाढ झाली आहे.
होते. सध्या घाऊक बाजारात १५% दरवाढ वाढले आहेत. पुढील कालावधीत आणखीन दरवाढ होण्याची शक्यता असल्याचे मत घाऊक व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे. एपीएमसी बाजारात पालेभाज्या, कोथिंबीर, दोडका, वाटाणा, फरसबी दरात अधिक वाढ झाली आहे तर इतर भाज्या ५ रुपयांनी महागल्या आहेत. पालेभाज्या विशेषतः कोथींबीरचे दर वधारले आहेत. घाऊक बाजारात आधी कोथिंबीरच्या २५-३०गाड्या दाखल होत होत्या त्या आता १५- २०गाड्या दाखल होत आहेत. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी किरकोळ बाजारात १५-२०रुपयांनी मिळणारी जुडी आता ५०रुपयांवर पोचली आहे. तर घाऊक बाजारात नाशिकची ३० रुपयांना उपलब्ध असलेली कोथिंबीर आता ४०-५०रुपयांवर वधारली आहे. तर किरकोळ बाजारात ४० रुपये किलोने मिळणारा वाटाणा आता ८० रुपये तर घाऊक बाजारात ५०-५५ वरून ६०-६५ रुपयांनी महागला आहे. उन्हाळा सुरू झाल्याने भाज्यांची दरवाढ झाली आहे असे मत घाऊक व्यापारी भारत घुले यांनी व्यक्त केले.
भाज्यांची दरवाढ
भाज्या घाऊक दर(प्रतिकिलो)
आधी आता
कोथिंबीर ३०रु ४०-५०रु
फरसबी ५०-६०रु ७०रु
वाटाणा ५०-५५ रु ६०-६५रु
दोडका २०-२२ रु २८-३०रु
टोमॅटो १२-१६ रु १८-२०रु