आसूडगांव डेपोमध्ये बस धुण्यासाठी शेडींग उभारण्याची मागणी
नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाच्या आसूडगाव डेपोमध्ये बस वॉशिंग (धुण्यासाठी) करण्याच्या ठिकाणी शेड बांधण्यात यावे, अशी मागणी ‘नवी मुंबइ इंंटक’चे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
‘एनएमएमटी’च्या आसूडगांव डेपोमध्ये बस वॉशिंग (धुण्यासाठी) करण्यासाठी कर्मचाऱ्यांना बाराही महिने उघड्यावरच काम करावे लागत आहे. तुर्भे डेपोमध्ये बसेस वॉशिंग (धुण्यासाठी) करण्यासाठी शेड उपलब्ध आहे. त्यांना बसेस धुण्यासाठी फारसा त्रास होत नाही. आसूडगांव डेपोमध्ये बसेस वाशिंग करण्यासाठी शेड नसल्याने उन्हातही कर्मचाऱ्यांना उभे राहून बसेस धुवाव्या लागतात, बसेसची सफाई करावी लागते. सध्या कडक उन्हाचे दिवस आहेत. शेड नसल्याने उन्हाच्या त्रासात उभे राहून कर्मचाऱ्यांना उष्माघात आणि अशक्तपणाचा त्रास सहन करावा लागत आहे. शेड नसल्याने कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावरही प्रतिकूल परिणाम होवू लागला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना होत असलेल्या त्रासाचे गांभीर्य लक्षात घवून आपण संबंधितांना आसूडगांव डेपोमध्ये बसेस वॉशिंगसाठी शेड तातडीने उपलब्ध करुन देण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे सदर निवेदनातून केली आहे.