एपीएमसीत लाकडी पेट्या बनवणाऱ्यांचे अतिक्रमण
नवी मुंबई-: एप्रिल महिना सुरू होताच हापुस आंब्याचा मुख्य हंगाम सिजन सुरू होतो. त्यामुळे बाजारात मोठया प्रमाणात आंब्याची विक्री होत असते. आणि या आंब्याची ने-आण करण्यासाठी लाकडी पेट्या आवश्यक असतात. त्यामुळे या पेट्या बनवणाऱ्या व्यवसायिकांनी बाजार समितीच्या आसपासच आपले व्यवसाय थाटण्यास सुरुवात केली असून सेक्टर १९ एफ भुखंड क्रमांक १ वर सध्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून सदर व्यवसाय सुरू आहे. त्यामुळे अशा व्यवसायिकांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
हापुस आंब्याचा हंगाम सूरु होताच एपीएमसी बाजार आवारात तसेच बाजार समितीच्या आजूबाजूला लाकडी पेट्या बनवणाऱ्या व्यवसायिकांचे पेव फुटते.बाजार आवारात एपीएमसी प्रशासन तर बाजार आवाराबाहेर महापालिकेकडुन अशा व्यवसायिकांना हात ओले करून दरवर्षी संरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे असे व्यवसायिक अवैध रित्या असे व्यवसाय करताना दिसत असतात.एपीएमसी परिसरात सेक्टर १९ एफ येथील आरक्षित असलेल्या भुखंड क्रमांक एक वर सध्या लाकडी पेट्या बनवणाऱ्या एका व्यवसायिकाने मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून लाकडी पेट्या बनवण्याचा व्यवसाय थाटला आहे. या सर्व पेट्या परत फळ बाजारात विक्री साठी पाठवल्या जातात. सदर व्यवसाय हा पुर्णपणे अनधिकृत रित्या सुरू असल्याने अशा व्यवसायिकांवर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.