आडिवली-भुतवलीतील आदिवासींच्या घरांचे स्वप्न पूर्ण; गणेश नाईक यांच्या हस्ते वितरण
नवी मुंबई : आमदार गणेश नाईक यांच्या शुभहस्ते शनिवार , 21 मे रोजी आडिवली-भुतवली गावातील 21 आदिवासी बांधवांना महापालिकेच्या घरकुल योजनेतील घरांचे वाटप करण्यात आले. गावासाठी बांधलेल्या सुंदर कमानीचे उदघाटनही करण्यात आले. आ. नाईक यांच्याच संकल्पनेतून महापालिकेच्या माध्यमातून शहरातील आदिवासींसाठी घरकुल योजना साकारण्यात आली आहे. संजीव नाईक, संदीप नाईक, माजी महापौर जयवंत सुतार, स्थानिक माजी नगरसेवक रमेश डोळे, माजी नगरसेवक चंद्रकांत पाटील व अन्य मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार नाईक यांनी नवी मुंबई ही केवळ कोळी व आगरी बांधवांची मूळ भूमी नसून आदिवासींची देखील असल्याचे नमूद केले. ज्या आदिवासी बांधवांना घरे मिळाली आहेत त्यांचे अभिनंदन करतानाआ. नाईक यांनी एकही आदिवासी बांधव घरांपासून वंचित राहणार नाही, असा विश्वास दिला. आदिवासींना सुविधा देताना कायदा आड येता कामा नये. तसे झाले तर कायदा मोडून घरे बांधू, असा इशारा दिला. मागील 25 वर्षे नवी मुंबईच्या जनतेने आमच्यावर विश्वास ठेवला असून सुजाण जनतेने चांगल्या लोकांना निवडून दिल्यानेच शहराचा नेत्रदिपक विकास झाला आहे. जनतेचा हा विश्वास यापुढेही कायम राहिलं. आ. नाईक यांच्या सहकार्यामुळेच आडिवली-भुतवलीतीचा विकास झाल्याचे रमेश डोळे प्रास्ताविकात म्हणाले. आणखी किमान 100 गरीब व गरजू आदिवासी घरांच्या प्रतिक्षेत असल्याचे सांगून त्यांच्यासाठी घरकुल योजना
राबविण्याची विनंती केली. आडिवली-भुतवलीती सारखे आदर्श आदिवासी गाव संपूर्ण ठाणे जिल्हयात नसल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले. निवडणुका आल्या की विरोधी पक्षांचे नेते कामाला लागतात. आमच्या नेतृत्वाच्या सुचनेनुसार आम्ही वर्षाचे 365 दिवस, 24 तास कार्यरत असतो.
जयवंत सुतार म्हणाले, आ. नाईक हेच नवी मुंबईचे शिल्पकार असून आदिवासींसाठी घरकुल योजना त्यांच्याच प्रयत्नांतूनच आकारास आली आहे. नगरसेवक रमेश डोळे यांच्या पाठपुराव्यामुळे आधुनिक शाळा, मैदान, स्वच्छतागृहे, पाण्याच्या टाक्या, रस्ते अशा सर्व आवश्यक सुविधा आडिवली-भुतवलीत आहेत. नाईक यांनी आदिवासीबांधवांसाठी महानगर गॅसची जोडणी उपलब्ध करून द्यावी.