वाशी खाडी पुलावर डंपरच्या अपघातामुळे सायन पनवेल महामार्ग 4 तासापेक्षा अधिक काळ ठप्प
नवी मुंबई : वाशीहून मुंबईच्या दिशेने जाणारा मालवाहू डंपर शुक्रवारी सकाळी वाशी खाडी पुलावरील रस्ता दुभाजकवर धडकून दोन्ही बाजूकडील रस्त्यावर आडवा झाल्याने मुंबई-पुणे आणि पुणे-मुंबई या दोन्ही मार्गावरील वाहतूक ठफ्प झाली होती. त्यामुळे ऐन सकाळच्या वेळेस दोन्ही मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होऊन त्यात हजारो वाहने अडकून पडली होती. वाहतूक पोलिसांनी अपघातग्रस्त डंपर व रस्त्यावर पडलेला डंपरमधील माल क्रेनच्या साहाय्याने बाजूला काढून दुपारी 12 च्या सुमारास दोन्ही मार्गावरून वाहतूक सुरळीत केली. या प्रकारामुळे 4 तासापेक्षा जास्त काळ दोन्ही मार्गावरील वाहतूक कोंडीत हजारो वाहने अडकून पडल्याने हजारो प्रवाशांना त्याचा फटका बसला.
या घटनेतील अपघातग्रस्त डंपर शुक्रवारी सकाळी 5 वाजण्याच्या सुमारास खडीचा भुगा घेऊन वाशीहून मुंबईच्या दिशेने जात होता. सदर डंपर वाशी खाडी पुलावर आला असताना डंपर चालकाचा डोळा लागल्याने त्याचे डंपरवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे सदर डंपर खाडी पुलावरील रस्ता दुभाजक तोडून दोन्ही रस्त्याच्या मधोमध आडवा झाला. डंपरचा अर्धा भाग मुंबई लेनवर, तर अर्धा भाग पुणे लेनवर अशा स्थितीत उभा राहिल्याने डंपर मधील खडीचा भुगा संपूर्ण रस्त्यावर खाली पडला त्यामुळे दोन्ही बाजूकडील रस्ता अडवला जाऊन दोन्ही बाजूकडील वाहतूक ठप्प झाली. या अपघातात डंपर चालक किरकोळ जखमी झाल्याने तो घटनास्थळावरून निघून गेला. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी सकाळीच डंपर मालकाला संपर्क साधून त्याला पाचारण केले. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी अपघातग्रस्त डंपर बाजूला काढण्याचा प्रयत्न सुरू केला.
मात्र, सकाळी 7 च्या नंतर दोन्ही बाजूकडील वाहनात वाढ झाल्यानंतर मुंबई लेन वरील वाहतूक कोंडी थेट नेरूळपर्यंत तर पुणे लेन वरील वाहतूक देवनारपर्यंत पोहोचली. घटनास्थळी सकाळी 9 वाजता डंपर मालक आल्यानंतर वाहतूक पोलिसांनी जेसीबीच्या साहाय्याने रस्त्यावर पडलेला खडीचा माल दुस-या डंपरमध्ये भरला. त्यानंतर क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त डंपर बाजूला काढून दुपारी 12 च्या सुमारास दोन्ही मार्गावरील वाहतूक सुरू केली. दुपारनंतर देखील सायन पनवेल मार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू होती.
या वाहतूक कोंडीत दोन्ही मार्गावर हजारो वाहने 4 तासाहून अधिक काळ अडकून पडल्याने या वाहनातून प्रवास करणा-या प्रवाशांना फुकटचा मनस्ताप सहन करावा लागला. या प्रकारानंतर डंपर चालकावर गुन्हा दाखल करण्यासाठी तसेच डंपरची कागदपत्रे आणि फिटनेस तपासून योग्य ती कारवाई करण्यासाठी वाशी आरटीओला पत्रव्यवहार करण्यात आल्याचे नवी मुंबई वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी सांगितले.