निवडणुकीत छत्रपती संभाजी राजे यांना आमदार महेश बालदी यांचा पाठिंबा
उरण : छत्रपती संभाजी राजे यांनी आमदार . महेश बालदी यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी भाजपा उरण तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक रवी भोईर, उरण शहर भाजपा अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शहा, विनोद साबळे, अंकुश कदम, धनंजय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी अपक्ष उमेदवार छत्रपती संभाजी राजे यांना उरणचे आमदार महेश बालदी यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. राज्य सभेच्या रिक्त झालेल्या ६ जागांसाठी निवडणूक आयोगाने १० जून रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
महाराष्ट्रातील ६ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत संख्या बळाच्या जोरावर भाजपचे दोन तर महाआघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेस शिवसेना या तिन्ही पक्षांचे मिळून एक- एक खासदार सहज निवडून येतील असे जाणकारांचे म्हणणे आहे.
उर्वरित एका जागेसाठी महाआघाडी आणि भाजपात जोरदार रस्सीखेच सुरूअसताना आता राज्यसभेच्या निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून छत्रपती संभाजी राजे यांनीउडी घेतली आहे. त्यांच्या अपक्ष उमेदवारीला भाजपनेही अनुकूलता दर्शविली असल्याचे सांगितले जात आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेल्या छत्रपती संभाजी राजे यांनी शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आदी महाआघाडीच्या तसेच भाजप, अपक्ष आमदारांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे.