सफाईमित्रांच्या कुटुंबियांसमवेत नमुंमपा मुख्यालयात जागतिक कुटुंब दिन उत्साहात साजरा

नवी मुंबई  : प्रत्येकजण आपल्या कुटुंबावर प्रेम करीत असतो व त्यांची काळजी घेत असतो. नवी मुंबई महानगरपालिका हे देखील एक कुटुंब असून त्यामधील एक महत्वाचा घटक असलेल्या सफाईमित्रांच्या  कुटुंबियांसमवेत आजचा जागतिक कुटुंब दिन  साजरा करण्याचा आनंद काही वेगळाच आहे अशा शब्दात घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.बाबासाहेब राजळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

      संयुक्‍त राष्ट्र महासभेने 1993 मध्ये घोषित केल्यानुसार 15 मे हा दिवस संपूर्ण जगभरात जागतिक कुटुंब दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात महापालिका आयुक्त  अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली सफाईमित्र कामगारांच्या कुटुंब मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

      याप्रसंगी शहर अभियंता संजय देसाई, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त तथा स्वच्छ भारत मिशनचे महानगरपालिका नोडल अधिकारी डॉ. बाबासाहेब राजळे, कार्यकारी अभियंता अरविंद शिंदे, मुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र सोनावणे, उपअभियंता स्वप्निल देसाई, वैभव देशमुख, दिलीप बेनके आदी मान्यवर उपस्थित होते.

      स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत सफाईमित्र सुरक्षा चॅलेंजमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेस देशात व्दितीय क्रमांकाचे मानांकन लाभले आहे. मॅनहोलऐवजी मशीनहोल असे सफाईमित्रांच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी घेणारे मलनि:स्सारण वाहिन्या व सेप्टिक टँक सफाईचे अत्याधुनिक स्वरूपातील यांत्रिकी रूपांतरण नवी मुंबई महानगरपालिकेने आधीपासूनच प्रभावीपणे राबविण्यास सुरूवात केलेली आहे. त्याचप्रमाणे सफाईमित्रांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना सुरू केलेल्या आहेत, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्तीची सुविधा आहे. त्यांच्या आरोग्याकडेही विशेष लक्ष देत विहित कालावधीत तपासणी केली जात आहे. त्यांना सफाईमित्र संबोधन लाभल्याने या कामगारांमध्ये आपल्या कामाविषयी सकारात्मक मानसिकता निर्माण झालेली आहे तसेच त्यांच्या कुटुंबियांमध्येही या कामाविषयी समाधानाची भावना आहे. याचेच दर्शन घडविणारी एक विशेष चित्रफित यावेळी प्रदर्शित करण्यात आली.   

      या कौटुंबिक स्नेहसंमेलनानिमित्त उपस्थित सफाईमित्रांच्या कुटुंबियांच्या मनोरंजनासाठी मराठी, हिंदी गीतांच्या सुमधुर वाद्यवृंदाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. या सर्वांनी एकत्रितपणे हा कुटुंब दिन अतिशय उत्साहात साजरा करताना ही आगळीवेगळी संकल्पना राबविल्याबद्दल आनंद व्यक्त केला.     

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी केले नवी मुंबई महानगरपालिकेच्या वैशिष्टपूर्ण कामांचे पाहणीअंती कौतुक