मलनिस्सारण प्रक्रिया केंद्रातील देखभाल दुरुस्तीच्या ठेक्यात भ्रष्टाचार ?
नवी मुंबई-: नवी मुंबई महानगरपालिकेच्या मलनिस्सारण केंद्रात मलयुक्त पाण्यावर प्रकिया करून ते खाडीत सोडले जाते. तसेच या कामासाठी मनपाच्या वतीने ठेकेदार नेमले आहेत. मात्र, सानपाडा सेक्टर २० येथील मलनिस्सारण केंद्रात ठेकेदारामार्फत सांडपाण्यावर कुठल्याही प्रकारची प्रकिया न करता पाणी थेट खाडीत सोडले जाते. त्यामुळे ठेकेदारामार्फत अतिशर्थीचे उल्लंघन करत मनपाच्या पैशावर डल्ला मारण्याचा प्रकार सुरू आहे असा आरोप करत सदर ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मानवधीकार परिषदेचे नवी मुंबई अध्यक्ष सुदर्शन डोंगरे यांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सेक्टर २०, सानपाडा येथील मलनिस्सारण प्रक्रिया केंद्र ( ३७-५० दशलक्ष लीटर ) सी टेक अत्याधुनिक तंत्रज्ञान आधारित केंद्राचा देखभाल दुरुस्तीचा पंच वार्षिक ठेका किसन कन्स्ट्रक्शन यांना दिला आहे. मात्र सदर ठेकेदाराच्या वतीने सांडपाण्यावर कुठल्याही प्रकारची प्रक्रिया न करता मलयुक्त सांडपाणी खाडीमध्ये सर्रासपणे सोडले जाते. तसेच ६ ब्लोर पंप पैकी ४ पंप बंद आहेत व वेटवेल मधील सबमर्शेबल पंप ३ वर्षापासुन तिन्ही पंप बंद आहेत. शिवाय पंपाचे पाईप फाटलेल्या परिस्थितीमध्ये असून त्यातुन मोठया प्रमाणावर मलयुक्त पाणी बाहेर फेकले जाते. स्कोर स्कीन मशीन गेल्या कित्येक वर्षापासून बंद असून सदर मशीनचा कुठल्याही प्रकारची दुरुस्ती व देखभाल केली गेलेली नसून स्कु कनवेल (वनज कचरा काढण्याची मशीन) गेल्या १ ते दीड वर्षापासून बंद असून कुठल्याही प्रकारची दुरूस्ती केली गेलेली नाही. मल कचरा वाहून नेणारा ट्रॅक्टर व ट्रॉली गेली कित्येक वर्षापासून बंद अवस्थेत आहे, याचा अर्थ गेल्या कित्येक वर्षापासून सदर मलयुक्त कचरा वाहुन नेला नाही. तरी देखील वरील बाबींची पूर्तता न करता संबंधीत ठेकेदाराला मनपाच्या वतीने वर्षानुवर्षे देयक (बिल) काम न करता देण्यात आले आहेत असा आरोप करत सदर प्रकरणाची चौकशी करुन संबंधित ठेकेदारावर काळ्या यादीत टाकण्यात यावे अशी मागणी मानवधीकार परिषदेचे नवी मुंबई अध्यक्ष सुदर्शन डोंगरे यांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे.
मलनिस्सारण केंद्राची सुरक्षा वाऱ्यावर
कुठल्याही मलनिस्सारण केंद्रातील सर्वसामान्य नागरिकांना प्रवेश, वावर वर्जित असतो. मात्र सानपाडा सेक्टर २० येथील मलनिस्सारण केंद्रात आजूबाजूच्या झोपडपट्टीतील लहान मुले तसेच नागरीकांचा वावर दिसतो. त्यामुळे येथील सुरक्षा वाऱ्यावर सोडल्याने या ठिकाणी एखादी दुर्घटना घडून मनुष्यहानी झाली तर याला जबाबदार कोण ? तर सदर प्रक्रिया केंद्रामध्ये मोठया प्रमाणात ठेकेदाराकडून झोपडपट्टी वसवण्यात आली असून तेथे राहणारे लोकं कामगार दारू पिऊन धिंगाणा घालताना आढळून आलेले आहेत, असा आरोप देखील सुदर्शन डोंगरे यांनी केला आहे.