एक महिन्यातच फ्लेमिंगोचे बगळे झाले ?
नवी मुंबई -: स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नवी मुंबई शहराच्या सौंदर्यात भर पडावी म्हणून महापालीकेच्या वतीने फ्लेमिंगो सिटी ही संकल्पना पुढे आणत शहरातील चौका चौकात,रस्त्यात फ्लेमिंगोच्या शिल्पकृती उभारल्या आहेत. मात्र स्वच्छ भारत अभियान स्पर्धा संपण्याच्या आताच या फ्लेमिंगोचे रंग फिके पडले आहेत. त्यामुळे शहरातील फ्लेमिंगोचे बगळे कसे झाले? अशी उपासात्मक टीका आता होऊ लागली असून मनपाकडुन करण्यात येत असलेल्या कामाच्या दर्जावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
नवी मुंबई शहरातील नेरूळ सिवूड, ठाणे खाडी किनारी ऐरोली, वाशी, बेलापूर इत्यादी ठिकाणच्या खाडीकिनारी पाणथळ जागेत मोठ्या प्रमाणावर फ्लेमिंगो पक्ष्यांचे स्थलांतर होत असते फ्लेमिंगो या पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे पर्यटकांचे उत्सुकता निदर्शनास येते त्यामुळे नवी मुंबई ही आगामी कालावधीत फ्लेमिंगो सिटी ओळखावी म्हणून नवी मुंबई महापालिकेने स्वच्छता सर्वेक्षण अभियानांतर्गत 'फ्लेमिंगो सिटी' म्हणून नवी मुंबईची असलेली ओळख अधोरेखीत व्हावी, म्हणून शहरातील चौका चौकात तसेच रस्त्याच्या दुभाजकात फ्लेमिंगो शिल्प बसवले आहेत. मात्र ज्या प्रमाणे स्थापत्य विभागात सुमार दर्जाची कामे केली जातात तोच कीत्ता आता फ्लेमिंगो शिल्पांच्या बाबतीत गिरवला आहे. कारण एक महिन्यापूर्वी शहरात गडद गुलाबी रंगाचे फ्लेमिंगो बसवले होते. मात्र अवघ्या एक महिन्यात या फ्लेमिंगोचा रंग उडू लागला व ते सफेद दिसू लागले आहेत. त्यामुळे हे फ्लेमिंगो आहेत की बगळे ? असा सवाल आता नवी मुंबईकरांना पडला आहे.तर सफेद पडलेल्या फ्लेमिंगोना पुन्हा गुलाबी रंग लावण्याची नामुष्की मनापावर आली आहे. त्यामुळे फ्लेमिंगोच्या रंगाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
पावसाळ्यात फ्लेमिंगो तग धरतील का?
नवी मुंबई महानगर पालिकेच्या वतीने फ्लेमिंगो सिटी च्या नावाखाली शहरभर फ्लेमिंगो नटवले आहेत. मात्र एक महिन्यातच हे फ्लेमिंगो फिके पडत गेल्याने आगामी पावसाळ्यात हे फ्लेमिंगो तग धरतील का ?असा सवाल या निमित्ताने उपपस्थित होत आहे.