मनसेच्या इशाऱ्यानंतर अवैध व्यवसायिकांवर कारवाई
नवी मुंबई-: एपीएमसी फळ बाजार आवारात अनधिकृत लाकडी पेट्या बनवणाऱ्या व्यवसायीकांवर कारवाई करा अन्यथा मनसे स्टाईल ने कारवाई केली जाईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी एपीएमसी प्रशासनाला दिला होता आणि या इशाऱ्याची दखल घेत एपीएमसी प्रशासनाने शुक्रवारी संध्याकाळी अवैध लाकडी पेट्या बनवणाऱ्या व्यवसायिकांवर कारवाई केली.
कृषी उत्पन्न बाजार समिती मधील फळ मार्केट मध्ये सध्या आंब्याच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आंबा ठेवण्यासाठी लाकडी पेटीची गरज भासते. आंबा हंगामात बाजारात रोज हजारो पेट्यांची उलाढाल होते. त्यामुळे आंबा हंगामात अनधिकृत लाकडी पेटी व्यवसायीक प्रशासनिक अधिकाऱ्यांसोबत हातमिळवणी करून बाजार आवारातच अवैध रित्या व्यवसाय थाटतात. लाकडी पेट्या सोबतच बाजारात सुक्या गवताचा साठा देखील केला जातो त्याने वारंवार आगीच्या घटना देखिल या ठिकाणी घडल्या आहेत. नुकतीच ८ एप्रिल २०२२ रोजी याठिकाणी सुक्या गवताला आग लागल्याची घटना घडली होती. मात्र अग्निशमन दलाने वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र आग लागून देखील या अवैध व्यवसायिकांकडुन एपीएमसी प्रशासनातील अधिकाऱ्यांचे हात ओले होत असल्याने त्यांच्याकडे एपीएमसी प्रशासन कानाडोळा करीत आले आहे. त्यामुळे भविष्यात अश प्रकारच्या घटना घडून जीवित हानी किंवा इतर प्रकारे बाजार समितीचे व व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान होऊ नये म्हणून फळ मार्केटची प्रत्यक्ष पडताळणी करून अनधिकृत साठा करणाऱ्या व्यापारी वर्गावर त्वरीत कडक कारवाई करून फळ मार्केट मध्ये असणारा साठा बाहेर काढावा किंवा जप्त करावा अशी मागणी एपीएमसी प्रशासनाकडे मनसे सहकार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी केली असून सात दिवसात कारवाई न केल्यास मनसे स्टाईल ने आंदोलन करुन सदर व्यवसायिकांना बाहेर काढण्यात येईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी ही एपीएमसी प्रशासनाची राहील असा इशारा देखील शिंदे यांनी दिला होता. आणि या इशाऱ्याची दखल घेत एपीएमसी प्रशासनाने शुक्रवार दिनांक ६ मे रोजी संध्याकाळी जेसीबीच्या सहाय्याने या अवैध लाकडी पेट्या बनवणाऱ्या व्यवसायिकांवर कारवाई केली.