महापेत डिझेल चोरीचे सत्र सुरूच, प्रशासनाचे दुर्लक्ष
नवी मुंबई-: महापे शिळ मार्गावर अडवली भुतावली गावाजवळ पाईप लाईनला टॅप मारून डिझेल माफियांनी डिझेल चोरीचे सत्र सुरू ठेवले आहे.अशा प्रकाराने मागील महिन्यात या ठिकाणी आगीची घटना घडली होती. मात्र आग लागुन दोन दिवस उलटत नाही तोवर पुन्हा एकदा या ठिकाणी डिझेल माफियांकडुन डिझेल चोरीचे सत्र कायम ठेवल्याने या प्रकाराला पोलिस प्रशासनाचा छुपा पाठिंबा आहे का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
महापे शिळफाटा मार्गालगत बीपीसीएल कंपनीची पेट्रोल, डिझेल आणि केरोसीन वाहिनी गेली आहे आणि या वाहिनीला टॅप मारून डिझेल गळती तयार केली जाते आणि ठराविक अंतरावर नाल्याच्या माध्यमातून एका ठिकाणी हे तेल जमा करून टॅंकरमध्ये भरले जाते.
मागील महिन्यात ५ एप्रिल २०२२ रोजी महापे-शीळफाटा मार्गालगत अडवली भुतावली गावाजवळ असलेल्या बीपीसीएलच्या पेट्रोलवाहिनीतून गळती झाल्याने आग लागली. पाईपलाईनमधून गळती झालेले पेट्रोल नाल्याद्वारे सगळीकडे पसरल्याने आग सुमारे १ किलोमीटर परिसरात पसरली होती. मात्र सदर घटनेला दोन दिवसांचा कालावधी उलटत नाही तोवर पुन्हा एकदा याठिकाणी पाईप लाईनला टॅप मारून डिझेल माफियांनी डिझेल चोरीचे सत्र सुरू ठेवले आहे. त्यामुळे या प्रकाराला पोलिस प्रशासनाचा छुपा पाठिंबा आहे का? असा सवाल मागील महिन्यात लागलेल्या आगीच्या तपासावरून आता उपस्थित केला जात आहे.
महापे शिळफाटा रस्त्यालगत असलेल्या इंधन पाईपलाईन ला टॅप मारुन तेल चोरीचे सत्र मागील कित्येक महिन्यांपासून सुरू आहे. आणि या प्रकाराने या ठिकाणी मागील महिन्यात आग देखील लागली आहे. मात्र आग लागून देखील दुसऱ्या दिवसापासून पुन्हा तोच प्रकार सुरू आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.
- अमोल नाईक, सामाजिक कार्यकर्ते.
महापे शिळफाटा रस्त्यालगत जर पेट्रोल डिझेल पाईप लाईन ला टॅप मारून तेल चोरीचा प्रकार सुरू असेल तर त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर उचित कारवाई केली जाईल.
- राजेंद्र आव्हाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाणे.