विशेष मिशन इंद्रधनुष 4.0 लसीकरण मोहिमेची 2 मे पासून तिसरी फेरी

 नवी मुंबई  : केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात मार्च ते मे 2022 या कालावधीत विशेष मिशन इंद्रधनुष 4.0 च्या तीन मोहिमांचे नियोजन करण्यात आले आहे. यातील प्रथम फेरी 7 मार्च ते 13 मार्च 2022 व  दुसरी फेरी 4 एप्रिल 2022 ते 10 एप्रिल 2022 मध्ये राबविण्यात आली. या मोहिमेची तिसरी फेरी 2 मे 2022 पासून राबविण्यात येत आहे.  

      बालकांमधील मृत्यू व आजाराचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण हे प्रभावी साधन असून नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात अर्धवट लसीकरण झालेली तसेच लसीकरण न झालेली बालके ही पूर्ण लसीकरण झालेल्या बालकांपेक्षा लवकर आजारी पडतात किंवा मृत्यू पावतात असे आढळून आसेले आहे. यामुळे या मोहिमेत लसीकरणापासून पुर्णपणे वंचित राहिलेल्या किंवा अर्धवट लसीकरण झालेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांचे लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दीष्ट नजरेसमोर ठेवण्यात आलेले आहे.

      सदर मोहीमेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्याकरिता लसीकरण टास्क फोर्सची बैठक आयोजित कऱण्यात आली होती. यामध्ये IMA, IAP अध्यक्ष, ICDS प्रतिनिधी, रुग्णालय प्रमुख व नागरी प्राथमिक आरोग्य केद्रांचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. सदर सभेमध्ये अपेक्षित लाभार्थ्यांच्या यादीपैकी प्रत्येक लाभार्थीवर लक्ष केंद्रीत करुन 100% उद्दिष्टपूर्ती करणेकरिता प्रत्येक वैद्यकीय अधिकारी यांनी विशेष प्रयत्न करण्याबाबत सूचित करण्यात आलेले आहे.

या मोहीमेच्या 7 मार्च ते 13 मार्च 2022 या कालावधीत राबविण्यात आलेल्या प्रथम फेरीत एकूण 65 सत्रांव्दारे 378 गरोदर माता व 1569 बालकांचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवण्यात आले होते. या मोहिमेमध्ये एकूण 387 गरोदर मातांना व 1529 बालकांना लसीकरण करण्यात आले.

सदर मोहीमेची दुसरी फेरी 4 एप्रिल 2022 ते 10 एप्रिल 2022 या कालावधीत राबविण्यात आली. यामध्ये एकूण 69 सत्रांव्दारे 372 गरोदर माता व 1325 बालकांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. सदर मोहिमेमध्ये एकूण 385 गरोदर मातांना व 1369 बालकांना लसीकरण करण्यात आले आहे. सदर मोहीमेला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला.

      तिसरी फेरी 2 मे ते 9 मे  2022 रोजी राबविण्यात येणार असून यासाठी 62 बाहयसत्रे व 06 मोबाईल सत्रे अशा एकूण 68 सत्रांचे नियोजन करण्यात आले असून 290 गरोदर माता व 1174 बालकांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून सर्व कर्मचाऱ्यांचे पुन:श्च प्रशिक्षण घेण्यात आले आहे.

      नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात नियमित लसीकरणांतर्गत बीसीजी, बी ओपीव्ही, हिपॅटायटीस बी, पेंटाव्हॅलंट, एफ आयपीव्ही, रोटा, गोवर रुबेला, टीडी, डीपीटी, पीसीव्ही या लसी मोफत देण्यात येत असून प्रत्येक इंजेक्शनकरिता नवीन सिरींज व नीडल वापरण्यात येते. तरी सर्व नागरिकांनी आपल्या पाच वर्षापर्यंतच्या मुलांना लसीकरण करुन संरक्षित करावे असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

हवा गुणवत्ता राखण्याविषयी जागरूकतेबाबत बांधकाम विकासकांची कार्यशाळा