देशाच्या प्रगतीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची नितांत आवश्यकता - राजरत्न आंबेडकर
नवी मुंबई : देशाच्या प्रगती आणि उन्नतीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर मार्गक्रमण करण्याची नितांत आवश्यकता आहे असे प्रतिपादन वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्टचे सचिव राजरत्न आंबेडकर यांनी केले. सिडको बी.सी.एम्प्लॉईज असोसिएशनच्या वतीने गुरुवारी सिडको भवनमध्ये विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते.
या प्रसंगी सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. कैलास शिंदे, पोलीस उपमहानिरीक्षक तथा मुख्य दक्षता अधिकारी डॉ.शशिकांत महावरकर, व्यवस्थापक (कार्मिक) फैयाज खान, सिडको एम्फ्लॉईज युनियनचे अध्यक्ष विनोद पाटील, सिडको बी.सी.एम्प्लॉईज असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र हिरे, सरचिटणीस नितीन कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी राजरत्न आंबेडकर यांनी डॉ. आंबेडकरांनी निर्मिलेले संविधान हे विविधता असलेल्या भारतासारख्या देशातील नागरिकांना एकत्र ठेवण्याचे काम करत आहे असे सांगतानाच सध्याच्या काळातील नगर नियोजन, मध्यवर्ती बॅंक, उर्जा व जल नियोजन या संकल्पनांचे मूळ हे डॉ.आंबेडकरांनी मांडलेल्या विचारांमध्ये तसेच त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांमध्ये असल्याचे स्पष्ट केले.
समाजातील सर्व घटकांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणे हीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना खरी मानवंदना ठरेल, असे मत डॉ.कैलास शिंदे यांनी या प्रसंगी व्यक्त केले. तसेच त्यांनी सिडको बी.सी.एम्फ्लॉईज असोसिएशन राबवित असलेल्या सामाजिक उपक्रमांची प्रशंसाही केली. तर डॉ. शशिकांत महावरकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महापुरुषांची शिकवण आचरणात आणणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्तींना आणि कर्मचा-यांना सिडको बी.सी.एम्प्लॉईज कडून यावेळी सन्मानित करण्यात आले. यात सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक अश्विन मुदगल, सिडकोचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. बी. एस. बावस्कर, व त्यांचे आरोग्य विभागातील सहकारी, सिडकोचे सांख्यिकी विभाग प्रमुख डॉ. एल. एस. शेख, सिडकोचे परिवहन अभियंता अविनाश शाबादे, मुख्य अग्निशमन अधिकारी विजय राणे, मिनाक्षीताई तांडेल, साहित्यिक व माजी सिडको कर्मचारी, सिडकोचे लेखापाल दिलीप वैद्य आणि लेखा सहाय्यक संतोष ठाकूर यांचा समावेश होता.
सिडको बी.सी.एम्फ्लॉईजकडून या वर्षी सामाजिक उपक्रमांतर्गत पनवेल तालुक्यातील तीन आदिवासी पाडयामध्ये कूपनलिकेची (बोअरवेल) व्यवस्था करण्याचे काम करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितीन कांबळे यांनी, सूत्रसंचालन माधुरी माणिककुवर तर आभारप्रदर्शन सुधीर कोळी यांनी केले. या जयंतीच्या कार्यक्रमात सिडकोतील विभाग प्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.