जागतिक पुस्तक  दिनानिमित्त  12 तास वाचन, अभ्यास  स्पर्धेचे आयोजन 

खारघर :  पुस्‍तके अथवा ग्रंथ यांच्‍या सारखा दुसरा गुरु नाही, असे म्‍हटल्‍या जाते. मात्र   डिजिटायझेनच्या युगात वाचन संस्कृती लुप्त पावत चालली आहे.या संस्कृतीला जिवंत ठेवण्यासाठी व जागतिक स्तरावर सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणुन प्रसिद्ध असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्त श्रद्धांजली वाहण्यासाठी खारघर मधील  सत्याग्रह महाविद्यालयात जागतिक पुस्तक दिनाचे निमित्त 12 तास वाचन स्पर्धा शनिवार . 23 एप्रिल रोजी  पार पडली.
 
    सत्याग्रह कॉलेज, सिद्धार्थ मल्टीपरपज रेसिडेन्शल हायस्कुल, अजिंठा इंटरनॅशनल स्कुल यांच्या माध्यमातुन हि स्पर्धा आयोजित करण्यात आली होती .या स्पर्धेत तीन गट पाडण्यात आले होते. पहिला गट आठवी ते बारावी , बारावी ते पदवीधर दुसरा गट तसेच खुला गटात हि स्पर्धा पार पडली. नवी मुंबई, मुंबई मधील विद्यार्थी तसेच नागरिकांना या स्पर्धेत मोफत प्रवेशाची संधी देण्यात आली. शनिवारी सकाळी 9 वाजता या स्पर्धेला खारघर सत्याग्रह महाविद्यालयातील शांताबाई रामराम सभागृहात सुरुवात झाली. या स्पर्धेतील स्पर्धकांना सहा तास वाचन केल्यास स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तर 6 ते 8 तास वाचन केल्यास दोन हजार रुपये व प्रमाणपत्र , 8 ते 10 तास वाचन केल्यास तीन हजार रुपये ,आणि 10 ते 12 तास वाचन करणाऱ्यास चार हजार रुपये व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेच्या संपूर्ण कालावधी पूर्ण करून 12 तास अभ्यास करणाऱ्या स्पर्धकाला त्याच्या वाचनावर आधारित प्रश्न विचारून त्या पुस्तकाची उजळणी करण्यात येणार आहे. या प्रश्नांना उत्तर देणाऱ्या विद्यार्थ्यास 5 हजार रुपये तसेच पुस्तक व प्रमाणपत्र भेट देण्यात येणार असल्याचे  डॉ जी के डोंगरगावकर यांनी दिली.
 
     स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी 94 स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला.12 तासाच्या स्पर्धेत विद्यार्थ्यांना अल्पोपहार, जेवण, चहासाठी वेळ राखीव ठेवण्यात आला होता. वाचन, शिक्षणाचे महत्व समाजातील प्रत्येक घटकांना कळावे या हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयातील तीन हजार पुस्तकांचा संग्रह असलेल्या वाचनालयातुन स्पर्धकांना पुस्तक पुरविण्यात आली होती.
 
या पुस्तकांचे केले वाचन 
या स्पर्धेत मराठी, हिंदी , इंग्रजी पुस्तकांचे वाचन स्पर्धकांनी केले. यामध्ये प्राचीन भारताचा इतिहास, श्यामची आई, भारताचे संविधान, अग्निपंख , भगवतगीता, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची माईल स्टोन भाषणे, डिस्कव्हरी ऑफ इंडिया, योद्धा संन्यासी, भारत 2020 और उसके बाद, होळकर रियासत, ट्रान्सफॉर्मिंग इंडिया टू ट्रान्स फार्म,सत्याचे प्रयोग आदींसह विविध प्रकारच्या साहित्याचा यामध्ये समावेश होता.
 
Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

शेकाप नगरसेविका डॉ. सुरेखा विलास मोहोकर यांच्या प्रयत्नातून वडाळे तलाव येथे सुरक्षा रक्षक तैनात