बाबासाहेबांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाची भव्यता साकारणारे स्मारक - ना.श्री.एकनाथ शिंदे
नवी मुंबई : देशातील शेवटच्या माणसाला न्याय मिळावा अशी सर्वोत्कृष्ट घटना अनेक देशांच्या घटनांचा अभ्यास करून लिहिण्याचे अद्भूत कार्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले आहे. अशा थोर महामानवाचे स्मारकही तशाच प्रकारचे असावे ही भूमिका जपत नजर पोहचणार नाही अशी बाबासाहेबांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाची भव्यता प्रत्यक्ष साकारणारी जगभरातील उत्कृष्ट स्मारकांच्या उंचीची स्मारक वास्तू नवी मुंबई महानगरपालिकेने उभी केल्याबद्दल महापालिका आयुक्त अभिजीत बांगर व संबंधीत टीमचे महाराष्ट्र राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सेक्टर 15 ऐरोली येथे भूखंड़ क्र. 22 ए वर उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक वास्तूची नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली. याप्रसंगी ठाणे लोकसभा सदस्य राजन विचारे, महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंह तसेच प्रशासन व समाजविकास विभागाचे उप आयुक्त दादासाहेब चाबुकस्वार, शहर अभियंता संजय देसाई, अतिरिक्त शहर अभियंता शिरीष आरदवाड आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
प्रकल्प अनेक उभे राहतात मात्र या स्मारक वास्तूमध्ये जीव ओतून काम केल्याचे दिसून येत असून 30 ऑगस्ट 2021 रोजी स्मारकाच्या केलेल्या पाहणी दौ-यात आयुक्तांना जगभरातील स्मारकांची माहिती संकलीत करून हे स्मारक सगळ्या स्मारकांपेक्षा आगळे वेगळे झाले पाहिजे अशा सूचना दिल्या होत्या. त्याचे प्रत्यक्ष दर्शन या स्मारकात घडत असून अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी या स्मारकाला भेट देऊन हे इतर स्मारकांपेक्षा अत्यंत वेगळे स्मारक असल्याचे अभिप्राय नोंदविलेले आहेत यावरून या कामाच्या वेगळेपणाचे महत्व लक्षात येते असे पालकमंत्री महोदय म्हणाले.
महापरिनिर्वाणदिनाच्या पूर्वसंध्येला 5 डिसेंबर रोजी झालेल्या स्मारकातील विविध सुविधांच्या लोकार्पण समारंभाप्रसंगी डोमचे मार्बल व इतर कामे बाबासाहेबांच्या जयंतीपूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याचे पालन करून जयंतीपूर्वीच 100 टक्के कामे पूर्ण झाल्याबद्दल पालकमंत्री महोदयांनी आनंद व्यक्त केला.
मागील अनेक वर्षांपासून सुरु असलेले काम सूचना केल्याप्रमाणे आयुक्त अभिजीत बांगर यांनी प्रत्येक गोष्टीत बारकाईने लक्ष देऊन चालना दिली व हे काम दीड वर्षात कालबध्द रितीने पूर्ण केले याचा विशेष उल्लेख पालकमंत्री ना. श्री. एकनाथ शिंदे यांनी केला.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन प्रवासातील विविध घटनांची माहिती छायाचित्रांच्या माध्यमातून जनतेला देणारे, अत्याधुनिक ई-लायब्ररी, ऑडिओ - व्हिडिओ बुक्स, विपुल ग्रंथसंपदा अशा प्रकारचे समृध्द ग्रंथालय यातून एक अद्भूत स्मारक उभे राहिले असून याठिकाणी येऊन सर्वांना आदरांजली द्यावीशी वाटेल असे हे सर्वोत्कृष्ट स्मारक आहे असे अभिप्राय पालकमंत्री महोदयांनी नोंदविले.
बाबासाहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून "जागर 2022" सारखा नामवंत व्याख्यात्यांच्या मार्गदर्शनाचा उपक्रम आयोजित केल्याबद्दल विशेष कौतुक करीत हा ख-या अर्थाने बाबासाहेबांना अभिवादन करणारा वैचारिक उपक्रम असल्याचे मत व्यक्त करीत पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी जनतेला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.