जात प्रमाणपत्र पडताळणी मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन
नवी मुंबई :- महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहच्या अनुषंगाने', संपूर्ण महाराष्ट्रात सर्व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांमार्फत दि.०६ ते १४ एप्रिल,२०२२ या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्याअंतर्गत दिनांक १२ एप्रिल 2022 रोजी सकाळी १०.०० वा. ठाणे जिल्हयातील ११ वी १२ वी विज्ञान शाखेतील महाविदयालय संबंधित प्राचार्य व इतर कर्मचारी यांचे करीता जात पडताळणीची कार्यपध्दती याबाबत मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती ठाणे या कार्यालयाच्यावतीने जात पडताळणीची कार्यपध्दती याबाबत दिनांक १२ एप्रिल 2022 रोजी सकाळी १०.०० ते १२.०० पर्यंत द पिपल्स एज्युकेशन सोसायटी हायस्कूल आणि ज्यूनिअर कॉलेज, सेक्टर-1 सीबीडी, बेलापूर, नवी मुंबई या ठिकाणी मार्गदर्शन कार्यशाळेचे शिबिराचे आयोजन केले आहे. तरी उपरोक्त कार्यशाळेस ठाणे जिल्हातील ११ वी १२ वी विज्ञान शाखेतील तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्गातील विदयार्थ्यांनी तसेच ठाणे जिल्हा परिसरातील महाविद्यालयातील प्राचार्य/संबंधित कर्मचारी यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन ठाणे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य श्री.वासुदेव पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.