डोके चालवण्याची प्रेरणा देणारे बाबासाहेब आंबेडकर स्मारक - श्री.अरविंद जगताप*

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेने उभारलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक हे एक असे स्मारक आहे जिथे डोके टेकवण्याची नाही तर डोके चालवण्याची प्रेरणा मिळते अशा शब्दात स्मारकाबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त करीत सुप्रसिध्द लेखक अरविंद जगताप यांनी येथील ग्रंथसंपदा पाहून समाधान वाटते तसेच बाबासाहेबांचे अप्रतिम फोटो पाहून गहिवरून येते असे मत व्यक्त केले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने बाबासाहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित "जागर 2022" उपक्रमांतर्गत त्यांनी "गोष्ट छोटी डोंगराएवढी" या विषयास अनुसरून प्रबोधनात्मक सुसंवाद साधला.

आपला देश बडबड्या व बोलक्या लोकांचा देश असून अनेक लोक सोशल माध्यमांवरून तासनतास बोलत असतात. या समाज माध्यमांचा शोध परदेशात लागतो आणि त्याचा वापर मात्र आपल्याकडे जास्त होतो ही चिंता व चिंतन करण्याची गोष्ट असून मार्गदर्शन करण्याची आपल्याला भारी हौस असते. मात्र घोडा व बोकडाची मजेदार गोष्ट सांगत त्यांनी मार्गदर्शन करताना आपण सावध राहिले पाहिजे असे सांगितले.

काही माणसे बोलण्यापेक्षा आपल्या कामामधून मार्गदर्शन करतात असे सांगत त्यांनी विविध ठिकाणी छोट्या छोट्या गोष्टीतून समाजकार्य कऱणा-या साध्या माणसांच्या गोष्टी सांगितल्या. या साध्या साध्या गोष्टीच डोंगराएवढ्या होतात असे स्पष्ट करीत अऱविंद जगताप यांनी मी माझ्यापासून सुरुवात केली तरच छोटी गोष्ट डोंगराएवढी कधी होते आपल्यालाच कळत नाही असे सांगितले. अशा प्रामाणिक माणसांच्या भरवशावर हा देश चालतो असे सांगत त्यांनी देशाचा विचार करण्यापूर्वी आपण स्वत:चा विचार करावा आणि बदलांसाठी माणूस म्हणून एकत्र यावे असे मत व्यक्त केले. 

आपण भावनेला प्राधान्य देतो मात्र माणूस म्हणून विचार करणे ही आपली जबाबदारी असल्याचे स्पष्ट करीत त्यांनी गुगलवर ज्ञान मिळत नाही, तर ते वाचन व चिंतनातूनच मिळवावे लागते हे नव्या पिढीला सांगण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. तारुण्याचा उमेदीचा काळ स्वत:च्या प्रगतीसाठी असल्याचे भान तरुणाईने राखावे व जागरूकतेने वागावे यादृष्टीने अनेक उदाहरणे त्यांनी दिली.

सध्याच्या सोशल मिडिया प्रभावी युगात शब्दांचे शॉर्टफॉर्म लिहिण्याची सवय चिंताजनक असल्याचे सांगत पत्र म्हणजे मनातल्या भावना अभिव्यक्त करण्याचे प्रभावी माध्यम असल्याचे अरविंद जगताप म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांचे आज्ञापत्र हे व्यवस्थापनाचा आदर्श नमुना असल्याचे सांगत त्यांनी महापुरुषांच्या अनुकरणीय गोष्टींचा अंगिकार करण्याची व स्वत:मध्ये सकारात्मक बदल घडविण्याची गरज व्यक्त केली.

बाबासाहेबांनी महिलांना मतदानाचा अधिकार प्राप्त करून दिला, स्वतंत्र अस्तित्व दिले याबद्दल आपण कृतज्ञ असले पाहिजे असे सांगत अरविंद जगताप यांनी महिलांनी अधिक जागरुक होण्याची गरज व्यक्त केली. सामान्य माणूस म्हणून भवतालच्या परिस्थितीला आपणही जबाबदार असून याची जाणीव बाळगण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

नवी मुंबई महानगरपालिका बाबासाहेबांची जयंती आगळ्या वेगळ्या पध्दतीने विचारांच्या जागरातून साजरी करत असल्याबद्दल अरविंद जगताप यांनी विशेष कौतुक केले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

एसटी वर्कशॉपची जागा हॉस्पिटलसाठी, आणि ठाणे स्टेशनवरील डेपोची जागा भूमीगत पार्किंगसाठी