पामबीच मार्गावर आणखी एका सिग्नलची भर
नवी मुंबई-:पामबीच मार्गावरील कोपरी गाव ते महात्मा फुले चौक या अडीच किलोमीटरच्या रस्त्यावर आधीच सहा सिग्नल असुन देखील या मार्गावर ट्रक टर्मिनल येथे मनपाच्या वतीने १५ लाख खर्च करून आणखी एका सिग्नलची भर घातली आहे. मात्र सदर रस्त्यावर आता उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यात येणार असून देखील सिग्नल बसविण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.तर सिग्नलममुळे वाहतूक कोंडी फुटण्याऐवजी सिग्नल बसवल्याने वाहतूक कोंडीत आणखी भर होत असल्याने वाहन चालकांकडुन मात्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
पामबीच मार्गावरील कोपरी गाव ते महात्मा फुले चौक या अडीच किलोमीटरच्या रस्त्यावरील वाहतुक कोंडी फोडण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे.२८५ कोटी खर्च अपेक्षित असलेल्या या उड्डाणपुलाचा खर्च प्रशासकिय राजवटीत तो खर्च आणखी फुगवून ४०५ कोटीवर गेला असून त्यासाठी निविदा प्रकिया राबवली आहे.आणि एकूण पाच कंत्राटदारांपैकी दोन कंत्राटदार पात्र ठरले आहेत. व त्यातील कमी किंमतीच्या कंत्राटदारास हे कंत्राट देण्यात येणार आहे.त्यामुळे ही सर्व प्रकिया अंतिम टप्प्यात असताना मनपातर्फे या रस्त्यावर ट्रक टर्मिनल जवळ १५ लाख खर्च करून आणखी एक सिग्नलची भर घातली आहे. त्यामुळे आता अडीच कीलोमीटरच्या टप्यात एकूण सात सिग्नल झाले आहेत.मात्र सदर रस्त्यावर उड्डाणपूल होत असताना मनपा विद्युत विभागामार्फत अतिरिक्त सिग्नल बसबून वाहतूक कोंडीचे कोणते अर्थपूर्ण गणित सोडवण्याचा प्रयत्न केला आहे ?असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.तर सदर सिग्नल ची भर पडल्याने या मार्गावर आणखी वाहतूक कोंडी होणार असल्याने वाहन चालकांनी नाराजी व्यक्त केली आहे
सदर ठिकाणी सिग्नल बसवण्यात यावे अशी मागणी वाहतूक उपायुक्त यांनी केली होती अशी माहिती मनपा परिमंडळ एक मधील विद्युत अभियंता हरीश बेंद्रे यांनी दिली आहे. तर याबाबत वाहतूक पोलीस उपायुक्त यांच्या सोबत संपर्क साधला असता प्रतिसाद लाभला नाही.तसेच याप्रकरणी अधिक माहिती देण्यास मनपा विद्युत विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नकार दिल्याने या सिग्नल मागे नक्की कुणाची अर्थपूर्ण कोंडी फुटणार आहे ? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.