एमआयडिसी भागातील नागरीवस्तीत पाणीबाणी
नवी मुंबई-: स्वतःच्या मालकीचे धरणामुळे जलसंपन्न नवी मुंबई अशी ख्याती प्राप्त असताना शहरातील औद्योगिक वसाहतीतील नागरी वस्तीत आजही पाण्याची आणी बाणी सुरू असून नागरीकांना आपली तहान भागवण्यासाठी शौचालयातून पाणी भरण्याची नामुष्की खैरणे श्रमिक नगर मधील रहिवाशांवर आली आहे .
श्रमिक नगर भागात मोरबे धरणाचा पाणी पुरवठा नसल्याने या भागात एमआयडीसीकडून पाणीपुरवठा होतो, त्यात शुक्रवारी शट डाऊन असले की जो पाणी पुरवठा बंद होतो, तो थेट रविवारी मध्यरात्रीनंतर सुरू होतो. त्यानंतर पुन्हा सोमवारी नळाखाली रिकाम्या भांड्यांची गर्दी दिसते. नळाला पाणी कधी येणार या प्रतीक्षेत दिवस जातो, मात्र पाणी थेट पहाटे दोन वाजता तेही कमी दाबाने येते. त्यामुळे रोजच जागरण करावे लागते, तेव्हा कुठे पाणी मिळत असल्याचे संतप्त नागरिक सांगतात. सध्या खैरणेतील अनेक परिसरात पाणीबाणी सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना थेट महापालिकेच्या शौचालयाच्या पाण्याचा आधार घ्यावा लागतो. याठिकाणी देखील नागरिकांना पिण्यासाठी रात्री अपरात्री जागरण करावे लागते. तुटपुंज्या पाण्यात कशीबशी कामे उरकून थेंब थेंब पाण्याखाली हंडे, प्लास्टिकचे ड्रम, पेप्सीच्या बाटल्या भरण्याची वेळ श्रमिकनगरमधील झोपडपट्टीतील रहिवाशांवर आली आहे. याठिकाणी आठ सार्वजनिक नळ आहेत, मात्र सहा महिन्यांपासून फक्त दोनच नळांना पाणी येते, तेही कमी दाबाने. पहाटे दोन वाजता सुरू होणारे पाणी सकाळी पाच वाजेपर्यंत बंद होते. त्यामुळे नाइलाजास्तव नागरिकांना सार्वजनिक शौचालयातून पाणी भरावे लागते.