महापालिकेचे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल उभे राहणे काळाची गरज - आमदार मंदाताई म्हात्रे
सीबीडी येथे ओपन जीमचे लोकार्पण, गजेबो उद्यानाचे भूमीपुजन
नवी मुंबई ः ‘बेलापूर'च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या आमदार निधीतून सीबीडी येथे उभारण्यात येणाऱ्या गजेबो उद्यान (१० लाख) आणि कारंजे (१२ लाख) यांचा भूमीपुजन सोहळा तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान
येथे उभारण्यात आलेल्या ओपन जीमचे (७ लाख) लोकार्पण ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी आ. सौ. मंदाताई म्हात्रे, स्थायी समितीचे माजी सभापती डॉ.जयाजी नाथ, माजी नगरसेवक अशोक गुरखे, साबु डॅनियल, माजी
नगरसेविका सौ. स्वाती गुरखे, मनोहर बाविस्कर संतोष पळसकर, जयदेव ठाकूर, संजय ओबेरॉय, परबजीत चहल (मांजा), गोपाळ गायकवाड, अशोक नरबागे, किरण वर्मा तसेच ज्येष्ठ नागरिक आणि महिला वर्ग उपस्थित होते.
सीबीडी माझी कर्मभूमी असून सीबीडी मधूनच १९९५ मध्ये ज्येष्ठांच्या आशिर्वादाने राजकारणामध्ये पहिल्यांदा सुरुवात केली. त्यावेळी असलेले माझे सहकारी साबू डॅनियल, डॉ.जयाजी नाथ आणि अशोक गुरखे आजही माझ्या सोबत
आहेत. माझी कर्मभूमी असल्यामुळे या विभागातील प्रत्येक काम पूर्ण करणे माझे प्रथम कर्तव्य आहे. आजच्या भूमीपुजन आणि लोकार्पण समारंभाला ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती पाहून आनंद वाटत आहे. विकास कामे करीत
असताना राजकारण न करता विकास कामे करणाऱ्याला प्रोत्साहन दिले पाहिजे, असे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यावेळी म्हणाल्या. तर आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांची कार्यशैली, त्यांची काम करण्याची पध्दत आम्ही खूप वर्षांपासून जवळून पाहत आलो आहोत. सीबीडी येथे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल-मेडीकल कॉलेज उभारण्याबाबत त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. सीबीडीत हॉस्पिटल निर्माण होत असल्याने त्याचा सीबीडीवासियांसह आजुबाजुच्या तालुका, जिल्ह्यांनाही फायदा होणार आहे, असे सीबीडी मधील माजी नगरसेवक डॉ. जयाजी नाथ, अशोक गुरखे, साबू डॅनियल यांनी भाषणातून सांगितले.
दरम्यान, कोव्हीड काळातील भयंकर परिस्थिती पाहता महापालिकेचे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल उभे राहणे काळाची गरज होती. आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांची दूरदृष्टी पाहता त्यांची विकासकामांची घोडदौड अशीच सुरू
असावी, अशा शुभेच्छा यावेळी या माजी नगरसेवकांनी दिल्या. तसेच सीबीडी विकसित क्षेत्र असुनही येथे अजुनही आमदार निधीतून काही विकासकामे आम्ही सुचविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.