‘मनपसंत नंबर' ;  ७ महिन्यात ‘वाशी आरटीओ'ला साडेतीन कोटीचे उत्पन्न

३४२८ वाहन मालकांकडून व्हीआयपी, मनपसंत नंबर मागणी

वाशी ः नवी मुंबई शहरात मागील वर्षीपेक्षा यंदा वाहनांना व्हीआयपी आणि मनपसंत नंबर घेण्याकडे वाहन मालकांचा कल वाढला आहे. यातून वाशी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला (आरटीओ) अवघ्या ७ महिन्यात ३ कोटी ४७ लाख ८१ हजार रुपये इतके महसूल प्राप्त झाले आहे. मागील वर्षी व्हीआयपी आणि मनपसंत नंबर घेणाऱ्या वाहन मालकांकडून वाशी आरटीओ कार्यालयाला १ कोटी ९६ लाख ६३ हजार ५०० रुपये इतके उत्पन्न मिळाले होते.


वाहन खरेदी केल्यानंतर त्या वाहनाच्या नंबरवरुन समाजात आपली वेगळी ओळख व्हावी म्हणून वाहन मालक वाहनाला ‘व्हीआयपी नंबर' घेण्यास प्राधान्य देतात. तर काही वाहन मालक ‘पसंती'चा नंबर घेतात. वाहनासाठी व्हीआयपी आणि मनपसंत नंबर घेण्यासाठी आरटीओ कार्यालय द्वारे रितसर शुक्ल आकारले जाते. त्यासाठी एखाद्या पसंत असलेल्या नंबरची निवड करुन त्यासाठी लागणारी रक्कम वाहन मालकांकडून मोजली जात आहे. त्यात तीन हजारांपासून ते चार लाखापर्यंत रक्कम मोजण्याची तयारी वाहनमालक दाखवत आहेत. त्यामुळे नवे वाहन खरेदी केल्यानंतर त्या वाहनाच्या नंबर प्लेटवर ठराविक नंबरला वाहनांची बुकिंग होताच त्या पावतीद्वारे आवडीचा नंबर बुक करण्याची लगबग सुरु होते. अलिकडे बहुतांश वाहन धारक आवडीच्या नंबरला प्राधान्य देत असल्याने, हवा असलेला नंबर अगोदरच बुक करण्यावर सर्व वाहन मालकांचा भर असतो. त्यात दुचाकी, चारचाकी वाहन मालक आघाडीवर आहेत. तर काही व्यवसायिक वाहन मालक देखील व्हीआयपी आणि मनपसंत नंबर घेत आहेत.


मागील वर्षी ‘कोविड'मुळे वाहन खरेदी मंदावली होती. त्यामुळे एप्रिल २०२१ ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत २३४ वाहन मालकांनी व्हीआयपी आणि मनपसंत नंबर घेतले होते. यातून ‘वाशी आरटीओ' कार्यालयाला १ कोटी ९६ लाख ६३ हजार ५०० रुपये उत्पन्न मिळाले होते. मात्र, यंदा व्हीआयपी आणि मनपसंत नंबर घेणाऱ्या वाहन मालकांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, १ एप्रिल ते ३१ऑक्टोबर २०२२ या कालावधी ३४२८ वाहन मालकांनी व्हीआयपी आणि मनपसंत नंबर घेतले असून, त्यातून वाशी आरटीओ कार्यालयाला ३ कोटी ४७ लाख ८१ हजार रुपये इतके उत्पन्न मिळाले आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 ई-चावडी प्रणालीत माहिती अद्ययावत करण्याला प्राधान्य द्या -जिल्हाधिकारी शिनगारे