ई-चावडी प्रणालीत माहिती अद्ययावत करण्याला प्राधान्य द्या -जिल्हाधिकारी शिनगारे

ई-चावडी आणि ई-हक्क प्रणाली मुळे महसूल प्रशासनाचे कामकाज पारदर्शक आणि गतिमान होण्यास मदत

ठाणे ः सर्वसामान्यांच्या महसूल आकारणीसंदर्भात एकसुत्रता यावी. तसेच एकाच ठिकाणी माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी राज्य शासन ई-चावडी प्रणाली प्रकल्प राबवित असून या प्रकल्पामध्ये पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ४१६ गावांमधील महसूल दपतर अद्ययावत करण्याचे काम संबंधित महसूल यंत्रणांनी प्राधान्याने करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिल्या आहेत.

जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तलाठी, मंडळ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी डिजीटल इंडिया भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम अंतर्गत ई-चावडी आणि ई-हक्क विषयक जिल्हास्तरीय प्रशिक्षण ४ नोव्हंेबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झाले. त्यावेळी जिल्हाधिकारी शिनगारे यांनी मार्गदर्शन केले. ई-फेरफार समन्वयक तथा अपर जिल्हाधिकारी सरिता नरके यांनी ई-चावडी आणि ई-हक्क प्रणालीविषयक प्रशिक्षण दिले. अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे, उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे, अविनाश शिंदे, अभिजित भांडे पाटील, जयराज कारभारी, बाळासाहेब वाकचौरे, रोहित राजपूत, आदि यावेळी उपस्थित होते.

ई-चावडी प्रणालीमध्ये कोणत्या प्रकारे नोंदी करावे, त्यासाठी कोणती माहिती व कशा प्रकारे अद्ययावत करावी, संगणकीकृत सातबारा, ई-फेरफारमध्ये ई-चावडीचा उपयोग आदिंविषयी नरके यांनी प्रशिक्षण देऊन उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले.

ई-चावडी आणि ई-हक्क प्रणाली मुळे महसूल प्रशासनाचे कामकाज पारदर्शक आणि गतिमान होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर नागरिकांनाची सोय होणार आहे. जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यात घेण्यात आलेल्या गावांची माहिती ई-चावडीसाठी आवश्यक असलेल्या अष्टसुत्रीनुसार अद्ययावत करण्यात तातडीने सुरुवात करावी. येत्या डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील सर्वच गावे ई-चावडीवर येण्यासाठी प्रयत्न करु. राज्य शासनाच्या दृष्टीने सदर प्रकल्प महत्त्वाचे असल्याचे पुढील काळात याचा तालुका निहाय आढावा घेण्यात येईल, असे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी यावेळी सांगितले.

राज्यात संगणकीकृत सातबारा प्रकल्प राबविण्यात आला होता. तसेच आता शंभर टक्के ई-फेरफार ऑनलाईन होत आहे. आता त्याची पुढची पायरी म्हणून ई-चावडीद्वारे महसूलविषयक आकारणीची माहिती अद्ययावत करण्यात येत आहे. तसेच ई- हक्क प्रणालीमुळे नागरिकांना घरबसल्या वारसा नोंद,  ई-करार, बोजा चढविणे, बोजा उतरविणे, मयताचे नाव कमी करणे, शेरा कमी करणे, एकत्र कुटुंब नोंद कमी करणे, विश्वस्ताचे नाव कमी करणे अशी कामे करता येणार आहेत. तसेच हस्तलिखित आणि संगणकीकृत सातबारामधील तफावत दूर करण्यासाठी ई-हक्कद्वारे अर्ज करता येणार आहे. तसेच खातेदारांना त्यांची माहिती ऑनलाईन अद्ययावत करण्याची सोय यामध्ये देण्यात आली आहे. या सुविधांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घेण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावे, असे यावेळी नरके यांनी मार्गदर्शनात सांगितले.


उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे यांनी प्रास्ताविकात प्रशिक्षणामागील उद्देश सांगितला. तर अपर जिल्हाधिकारी जायभाये-धुळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पनवेल पालिकेत २३ गृप ग्रामपंचायतील 320 कामगारांना सेवेत कायम करण्याचा निर्णय