वाशी बस स्थानकातील वाणिज्य संकुल बांधकामाची आयुवतांकडून पाहणी

बस टर्मिनलसह वाणिज्य संकुल इमारतीचे काम गुणवत्तापूर्ण, विहित वेळेत करण्याचे महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांचे निर्देश

नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाच्या सक्षमीकरणासाठी करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांमध्ये वाशी बस स्थानकाच्या भूखंडावर बस टर्मिनलसह वाणिज्य संकुल विकसित करण्यात येत आहे. महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सदर कामाच्या सद्यस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करीत विहित कालावधीत काम पूर्ण करण्याचे निर्देश संबंधितांना दिले. त्याचप्रमाणे सदर इमारतीमधील सुविधा कार्यान्वित झाल्यानंतर त्याची दुरुस्ती-देखभाल नियमितपणे राखली जावी याकरिता आधीपासूनच नियोजन करुन सुयोग्य कार्यवाही करावी ,असेही निर्देश आयुक्तांनी अभियांत्रिकी विभागास दिले.याप्रसंगी शहर अभियंता संजय देसाई, कार्यकारी अभियंता अरविंद शिंदे आणि इतर अधिकारी, वास्तुविशारद आणि कंत्राटदार उपस्थित होते.

नवी मुंबई महापालिका पहिवहन उपक्रमाच्या (एनएमएमटी) अखत्यारितीतील वाशी, सेक्टर-९ येथील बस स्थानक भूखंडावर बस स्थानकासह वाणिज्य संकुलाची २१ मजली इमारत उभारण्याचे काम प्रगतीपथावर असून सद्यस्थितीत १९ व्या मजल्यावरील बांधकाम सुरु आहे. ४ नोव्हेंबर रोजी या बांधकामस्थळी भेट देत आयुक्त राजेश नार्वेकर यांनी प्रकल्पाची संपूर्ण माहिती जाणून घेतली. तसेच बारकाईने प्रत्यक्ष पाहणी करत विविध सुविधांमध्ये आवश्यक सूचना केल्या.

१०३७४.४२ चौ.मी. क्षेत्रफळाच्या भूखंडावर ४७७३१ चौ.मी. क्षेत्रफळाचे बांधकाम करण्यात येत असून जून २०२३ पर्यंत सदर बांधकाम पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. या बांधकामातील प्रत्येक टप्प्याची माहिती घेत आयुक्त नार्वेकर यांनी गुणवत्ता राखून विहित वेळेत काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले.


सदर इमारतीच्या तळमजल्यावर १३ बस स्थानके असून एनएमएमटी सह बेस्ट आणि एसटी महामंडळाचे स्वतंत्र नियंत्रण कक्ष असणार आहेत. याशिवाय तळमजल्यावर ७ दुकाने आणि सार्वजनिक स्वच्छतागृह व्यवस्था करण्यात आलेली आहे. पहिला मजला ते चौथा मजला येथे पार्किंगची व्यवस्था असून एकूण ४२० चारचाकी तसेच ४३ दुचाकी वाहनांच्या पाकर्िंगची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. इमारतीच्या पाचव्या मजल्यावर ६ रेस्टॉरंटची सुविधा असून प्रशस्त लॉन आहे. सहाव्या ते अठराव्या मजल्यावर प्रत्येक मजल्यावर ५ अशी एकूण ६५ ऑफिसेससाठी जागा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. १९ वा मजला विशेषत्वाने अग्निशमन आणि सुरक्षा विषयक बाबींकरिता उपलब्ध करुन देण्यात आला असून २० व्या आणि २१ व्या मजल्यावर प्रत्येकी ५ अशाप्रकारे १० ऑफिसेस असणार आहेत.


दरम्यान, वाशीतील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकानजिक विष्णुदास भावे नाट्यगृह आणि एमटीएनएल इमारतीसमोर मोक्याच्या जागी सदर इमारत आकर्षक आणि भव्य स्वरुपात उभी रहात असल्याने बस टर्मिनलची सुविधा तसेच विविध सेवांच्या कार्यालयांसाठी, दुकानांसाठी आणि रेस्टॉरंटसाठी जागा उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे महापालिका परिवहन उपक्रमास सद्यस्थितीत होत असलेली वित्तीय तूट दूर होण्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणावर वाहतूकबाह्य उत्पन्नाचा आर्थिक स्त्रोत उपलब्ध होणार आहे. सदर कामावर होणारा खर्च येथील सेवासुविधांच्या भाड्यामधून साधारणतः ८ वर्षांमध्ये वसूल होणे अपेक्षित असून त्याबाबतचीही वर्षनिहाय सांख्यिकी माहिती आयुक्त राजेश नार्वेकर यांनी जाणून घेतली. एकंदरीतच सदर इमारत विहित कालावधीत कामाचा दर्जा राखून उभी राहील आणि भविष्यात त्याची देखभाल-दुरुस्ती व्यवस्थित राहील याची दक्षता घेण्याचे निर्देश आयुवत राजेश नार्वेकर यांनी अभियांत्रिकी विभागास दिले. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘मनपसंत नंबर' ;  ७ महिन्यात ‘वाशी आरटीओ'ला साडेतीन कोटीचे उत्पन्न