ध्वनी प्रदूषणाचा विद्यार्थी, रुग्णांना त्रास

वाशी ः वाशी सेक्टर-९ आणि सेवटर-१० मध्ये सध्या सुरु असलेल्या धोकादायक इमारतींचे पुनर्विकास करण्याच्या कामासाठी पोकलेनच्या सहाय्याने खोदकाम सुरु आहे. मात्र, सदर खोदकाम करताना होत असलेल्या ध्वनी प्रदूषणामुळे वाशी सेवटर-९,१० मधील शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि रुग्णांना नाहक त्रास होत आहे. त्यामुळे ध्वनी प्रदूषणाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि रुग्णांकडून होत आहे.

शाळा, कॉलेज दवाखाने आदी भागात १०० मिटर परीघ क्षेत्रात ध्वनी प्रदूषण करण्यास मनाई असून, सदर भाग शांतता भाग म्हणून घोषित केलेला असतो. नवी मुंबई महापालिकेने २०१८ साली नवी मुंबई शहरात ७४ ठिकाणी शांतता भाग (सायलेन्स झोन) म्हणून जाहीर केले असून, ‘सायलेन्स झोन'चे फलक देखील लावण्यात आले आहेत. वाशी सेक्टर-९ आणि १० मधील सह्याद्री हॉटेल ते साईनाथ हायस्कूल या दरम्यानचा संपूर्ण रस्ता शांतता भाग आहे. मात्र, या ठिकाणी सुरु असलेल्या इमारत पुनर्विकासाच्या खोदकामात मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होत असल्याचे चित्र दिसत आहे. या ठिकाणी खोदकामात असलेला खडक फोडण्यासाठी पोकलेन, ब्रेकर यांचा वापर केला जात असल्याने मोठ्या प्रमाणात आवाज होत आहे. या खोदकामापासून अवघ्या १५ ते २० मिटर अंतरावर शाळा, लहान मुलांचा दवाखाना तसेच महापालिका प्रथम संदर्भ रुग्णालय आहे. त्यामुळे होत असलेल्या या ध्वनी प्रदूषणाचा येथील शाळेत शिकत असलेल्या विद्याथा-विद्यार्थिंनी आणि रुग्णालयातील रुग्णांना कमालीचा उगाचच त्रास होत  आहे. त्यामुळे वाशी सेक्टर-९ आणि १० मध्ये ध्वनी प्रदूषणाचे उल्लंघन करणाऱ्या व्यवतींवर कारवाई करण्याची तसेच आवाजाची पातळी कमी करण्याची मागणी आता स्थानिक नागरिकांकडून जोर धरु लागली आहे.

वाशी सेक्टर-९ आणि सेवटर-१० मध्ये सुरु असलेल्या खोदकाम ठिकाणी एमपीसीबी अधिकाऱ्यांमार्फत स्थळ पाहणी करुन आवाजाची पातळी तपासली जाणार आहे. त्यात जर ध्वनी प्रदूषणाचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले तर संबंधितांना नोटीस बजावून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. - जयंत कदम, एसआरओ - महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, नवी मुंबई. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

दिव्यांगाना 10 नोव्हेंबर रोजी सोडत पध्दतीने स्टॉल्सचे वितरण