पीएम स्वनिधी प्रक्रियेला गती द्या

नवी मुंबई ः केंद्र शासन पुरस्कृत ‘पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (झ्श् एन्न्ींऱ्ग्‌प्ग्) योजना'मध्ये नवी मुंबई महापालिकेचे काम एमएमआर क्षेत्रातील महापालिकांमध्ये सर्वोत्तम झालेले असले तरी १०० टक्के अर्जदारांना आत्मनिर्भर निधी उपलब्ध करुन देणे आपले उद्दिष्ट आहे. त्याकरिता येणाऱ्या अडचणी दूर करुन कर्ज उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने बँकांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून पुढाकार घ्यावा, असे आवाहन महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी केले आहे.


‘पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना'च्या प्रभावी अंमलबजावणीबाबत नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील बँकांच्या बैठकीप्रसंगी आयुक्त राजेश नार्वेकर यांनी निधी मंजूर झाल्यानंतरही त्याचे वितरण न झालेले अर्ज, बँकेच्या पातळीवर प्रलंबित असलेले अर्ज आणि पुरेशा कागदपत्रांअभावी परत पाठविण्यात आलेले अर्ज अशा ३ गोष्टींबाबत सकारात्मक दृष्टीने कार्यवाही करावी, असे बँकांच्या प्रतिनिधींना सूचित केले.

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, मुख्य लेखा-वित्त अधिकारी धनराज गरड, समाजविकास विभागाचे उपायुक्त  दादासाहेब चाबुकस्वार, शिखर बँकेचे व्यवस्थापक भारती आणि इतर अधिकारी व विविध बँकांचे व्यवस्थापक आणि प्रतिनिधी उपस्थित होते.

कष्ट करुन कुटुंब चालविणाऱ्या पथविक्रेत्यांना मदतीचा हात मिळावा यादृष्टीने केंद्र शासनाने ‘पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना' राबविण्यास कोव्हीड प्रभावीत काळात सुरुवात केली. ज्यायोगे कोव्हीड काळातील लॉकडाऊनमध्ये हातावर पोट असणाऱ्या पथविक्रेत्यांच्या उपजीविकेवर मोठ्या प्रमाणात झालेल्या परिणामातून त्यांना दिलासा मिळू शकेल. सदर योजनेच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात १० हजार रुपये इतके खेळते भांडवली कर्ज बँकांमार्फत उपलब्ध करुन दिले जात आहे. याचा लाभ नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील ५३०४ पथविक्रेत्यांनी घेतला. त्याचप्रमाणे २०४० पथविक्रेत्यांनी पहिल्या टप्प्यातील कर्ज फेड करुन दुसऱ्या टप्प्यातील २० हजार रुपये इतके खेळते भांडवली कर्ज उपलब्ध करुन घेतले.


पथविक्रेत्यांना सदर कर्ज उपलब्ध होण्यात कोणत्याही प्रकारची अडचण भासू नये याकरिता महापालिकेच्या समाजविकास विभागाच्या वतीने नियोजन करण्यात आले. बँकांशी समन्वय साधून पथविक्रेत्यांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत याकरिता विभागनिहाय समन्वयक नेमण्यात आले. विविध ठिकाणी शिबिरे आयोजित करुन पथविक्रेत्यांना अर्ज भरताना कोणत्याही अडचणी येणार नाहीत, याची विशेष काळजी घेण्यात आली. यामुळे नवी मुंबई महापालिकेचे कर्ज उपलब्ध करुन देण्याबाबतचे काम एमएमआर क्षेत्रातील महापालिकांमध्ये सर्वोत्तम आहे.

उर्वरित अर्जदारांना तसेच ज्यांचे अर्ज विविध कारणांनी प्रलंबित आहेत अथवा परत पाठविण्यात आलेले आहेत, अशा सर्व अर्जदारांना आवश्यक त्रुटींची पूर्तता करुन ‘पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना'अंतर्गत खेळते भांडवली कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी बँकांनी गतीमान कार्यवाही करावी.
-राजेश नार्वेकर, आयुवत-नवी मुंबई महापालिका. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ध्वनी प्रदूषणाचा विद्यार्थी, रुग्णांना त्रास