सिडकोच्या नियोजन शून्य कारभाराचा वाहन चालकांना फटका ?
नवी मुंबई -: शहरांचे शिल्पकार म्हणून ख्याती प्राप्त असलेल्या सिडकोने आता वाहन पार्किंगच्या भुखंडांवर गृहनिर्माण प्रकल्प उभे करण्यास सुरुवात केल्याने शहरात वाहन पार्किंगची समस्या जटील झाली आहे. त्यामुळे शहराच्या शिल्पकारांनीच शहराचे नियोजन बिघडवण्याचे काम हाती घेतले आहे का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
मुंबई शहरावरील वाढत्या लोकसंख्येचा ताण कमी करण्यासाठी शासनाने नवीन शहर वसवण्यासाठी सिडकोची नेमणूक केलीआणि सिडकोने देखील अगदी नियोजन बद्ध पद्धतीने नवी मुंबई शहराची निर्मिती केली. त्यामुळे शहराचे शिल्पकार अशी ख्याती सिडकोला प्राप्त झाली. सिडकोने शहराचे नियोजन करताना शहरात उद्याने, शाळा, कॉलेज, वाहन पार्किंग वर भर देत पुरेशी जागा उपलब्ध करून दिल्याने या शहराचे नागरीकरण झपाट्याने वाढले. त्यामुळे वाढत्या नागरीकरणामुळे वाहन संख्याही झपाट्याने वाढू लागली. त्यामुळे वाहन पार्किंगला जागा कमी पडू लागली. मात्र जागा अपुरी पडत असताना सिडकोने आहे त्या रेल्वे स्थानक, ट्रक टर्मिनल पार्किंग जागांवर गृहनिर्माण प्रकल्प उभे करण्यास घेतल्याने वाहन पार्किंगची समस्या बिकट होत चालली आहे आणि वाहन पार्किंगचा सर्वात मोठा त्रास एपीएमसी परिसरात होत आहे. येथील एकमेव ट्रक टर्मिनलच्या जागेत गृहप्रकल्प उभा राहत असल्याने अवजड वाहन पार्किंगला जागा मिळत नाही. परिणामी ही वाहने रस्त्याच्या कडेला उभी राहत असल्यामुळे येथे नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे वाहन पार्किंगचे नियोजन बदलून सिडकोने शहराचे नियोजन बिघडवण्याचे काम हाती घेतले आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
वाशीतील एपीएमसी मार्केट ही आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे येथे देशभरातील शेतमाल वाहनांमधून येत असतो. मात्र येथील एकमेव वाहन तळ सिडकोने बंद केल्याने येणाऱ्या वाहनांना रस्त्यावर थांबावे लागते. त्यामुळे या परिसरात रोजच वाहतुक कोंडी होते. - मनोहर तोतलानी, व्यापारी,कांदा बटाटा मार्केट एपीएमसी.