विना हेल्मेट शासकीय कार्यालयात प्रवेश केल्यास कारवाई
वाशी ः नवी मुंबई शहरात दुचाकीस्वारांचे वाढते अपघात लक्षात घेऊन रस्ते अपघातांबाबत प्रबोधन व्हावे, याकरिता तत्कालीन नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार यांच्या आदेशाने नवी मुंबई परिसरातील सर्व शासकीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारांवर हेल्मेट सक्ती बाबत फलक लावण्यात आले होते. मात्र, नवी मुंबई महापालिकेच्या मुख्यालय गेटवर लावण्यात आलेला ‘हेल्मेट सक्ती'चा फलक गायब झाला असल्याने ‘हेल्मेट सक्ती'ची अंबलबजावणी पुरती बारगळली आहे.
दिवसेंदिवस राज्यात वाहन अपघातांच्या संख्येत वाढ होत चालली असून, त्यातील ६० % अपघात दुचाकीस्वारांचे आहेत. मात्र, बऱ्याच वेळी अपघातावेळी डोक्यावर हेल्मेट नसल्याने दुचाकीस्वारांचे मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे दुचाकीस्वारांचे वाढते अपघात लक्षात घेता सर्व शासकीय कार्यालयांच्या प्रवेशद्वारावर हेल्मेट सक्ती करण्यात आली असून, ‘हेल्मेट सक्ती'चे फलक लावण्यात आले आहेत. ‘दुचाकीस्वाराने हेल्मेट परिधान केले असेल तरच प्रवेश' असे फलकावर लिहिण्यात आले होते. तत्कालीन नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी नवी मुंबई पोलीस आयुवतालय हद्दीतील शासकीय कार्यालयांमध्ये दुचाकीस्वारांना हेल्मेट परिधान करण्याचे आवाहन केले होते. त्या धर्तीवर नवी मुंबई वाहतूक शाखा तर्फे नवी मुंबई शहरातील सर्व शासकीय कार्यालयांच्या प्रवेशद्वारावर ‘हेल्मेट सक्ती'चे फलक लावले होते. मात्र, नवी मुंबईतील बहुतांश शासकीय कार्यालयांच्या प्रवेशद्वारावरुन ‘हेल्मेट सक्ती'चे फलक गायब झाले असून, त्यात नवी मुंबई महापालिका मुख्यालयाचा देखील समावेश आहे. त्यामुळे ‘हेल्मेट सक्ती'ची अंबलबजावणी पुरती बारगळली असल्याचे चित्र नवी मुंबई शहरात पहावयास मिळत आहे.