छत्रपती संभाजी महाराज उद्यान आणि डॉ. आंबेडकर उद्यानातील संगीत यंत्रणा बंद
नवी मुंबई ः नेरुळ, सेक्टर-२ येथील छत्रपती संभाजी महाराज उद्यान आणि जुईनगर सेक्टर-२५ मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात संगीत यंत्रणा सुरु करण्याची मागणी ‘नवी मुंबई जिल्हा काँग्रेस'च्या सचिव विद्या भांडेकर यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे केली आहे. नवी मुंबई महापालिकेचे नेरुळ, सेक्टर-२ येथे छत्रपती संभाजी महाराज उद्यान आणि जुईनगर सेक्टर-२५ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान आहे. कोव्हीड पूर्वी या दोन्ही उद्यानांमध्ये महापालिका प्रशासनाने संगीत यंत्रणा कार्यरत केली होती. उद्यानात वावरताना संगीत यंत्रणेच्या माध्यमातून रहिवाशांच्या कानावर चांगली गाणीही पडत होती. त्यामुळे गाणी ऐकताना रहिवाशांना एक वेगळेच समाधान प्राप्त होत होते. कोरोना महामारीचा काळ आला आणि महापालिका प्रशासनाने या दोन्ही उद्यानातील संगीत यंत्रणा बंद केली. आता कोरोना महामारी पूर्णपणे नियत्रंणात आलेली आहे. उद्यानामध्ये रहिवाशांची वर्दळ पूर्वीप्रमाणेच दिसू लागली आहे. राज्य सरकार तसेच महापालिका प्रशासनाने कोरोना निर्बंधही शिथील केले आहेत. त्यामुळे या दोन्ही उद्यानातील संगीत यंत्रणा पूर्वीप्रमाणे चालू करुन महपालिका प्रशासनाने स्थानिक रहिवाशांना दिलासा देण्याची मागणी विद्या भांडेकर यांनी महापालिका आयुवत राजेश नार्वेकर आणि नेरुळ विभाग अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.