४१९ हरकतींबाबत महापालिका उद्यान विभागाला कोडे

वाशी ः नवी मुंबई महापालिका तर्फे ३५१ कोटी रुपये खर्च करुन वाशी सेवटर-१७ मधील महात्मा फुले भवन ते कोपरी गाव पर्यंत उड्डाणपूल निर्मिती केली जात आहे. या प्रकल्पात ३९० झाडांचा बळी जाणार असल्याने राजकीय पातळीवर याचे पडसाद उमटले आहेत. प्रचंड गाजलेल्या या वृक्ष तोडी विरोधात सुमारे १००९ हरकती आल्या असून, त्यापैकी ४१९ हरकतदारांचा कुठलाच सुगावा लागत नसल्याने नेमक्या या हरकती कोणी आणि कशासाठी घेतल्या?, याचे कोड सध्या महापालिका उद्यान विभागाला पडले आहे.

महापालिका उद्यान विभागाने नियोजित वाशी-कोपरी उड्डाणपूल प्रकल्पासाठी ३९० पैकी ३८६ झाडे प्रत्यारोपण आणि ४ झाडे तोडण्याची परवानगी प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्याबाबत हरकती नोंदविण्यासाठी आधी सात दिवस मुदत देण्यात आली होती. मात्र, या प्रकियेला आमदार गणेश नाईक आणि माजी नगरसेवक राजू शिंदे यांनी आक्षेप घेतल्यानंतर महापालिका उद्यान विभागाने एक महिन्याची वाढीव मुदत दिली होती. मात्र, सदर झाडे वाचावी म्हणून राजकीय नेते ठाम होते.

वाशी-कोपरी उड्डाणपूल प्रकल्पातील झाडे वाचावी, याकरिता भाजप आमदार आशीष शेलार यांच्या उपस्थितीत आ. गणेश नाईक, माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, संजीव नाईक यांच्या समवेत भाजप पदाधिकाऱ्यांनी मोर्चा काढून चिपको आंदोलन केले होते. याच आंदोलनाच्या शेजारी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला तत्कालीन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली ‘राष्ट्रवादी'ने देखील आंदोलन केल्याने झाडांचा प्रश्न चांगलाच रंगला. तर ऐरोली मध्ये स्थानिक नेते अनंत सुतार यांनी सह्यांची मोहीम राबवत ‘झाडे वाचवा' आंदोलन पेटवत ठेवले. झाडांच्या बचावासाठी राजकीय पातळीवर जोरदार श्रेयबाजी रंगल्याने महापालिका प्रशासनाने एक महिन्यांची मुदतवाढ दिल्यावर १९०७ व्यवतींनी महापालिका उद्यान विभागाकडे हरकती नोंदवल्या आहेत. एखादी हरकत आल्यास त्यावर सुनावणी होते. या सुनावणीसाठी हरकतदारास पत्र काढून सुनावणीसाठी आमंत्रित केले जाते. वाशी-कोपरी उड्डाणपूल प्रकल्पातील झाडांबाबत १००९ हरकती आल्या. त्यातील ५५४ हरकती पात्र, ३६ हरकती दुबार तर ४१९ हरकती अपूर्ण आहेत. त्यामुळे या ४१९ हरकतदारांचा पत्ता, फोन नंबर नसल्याने सुनावणीसाठी संपर्क झाला नाही. त्यामुळे नेमक्या या हरकती कुणी आणि कशासाठी नोंदवल्या असाव्यात?, याचे कोडे आता महापालिका उद्यान विभागाला पडले आहे.

नियोजित वाशी-कोपरी उड्डाणपूल प्रकल्पासाठी ३९० पैकी ३८६ झाडे प्रत्यारोपण आणि ४ झाडे तोडण्याची परवानगी प्रक्रिया राबवली होती. यावर १००९ हरकती आल्या असून, बहुतांश हरकती अपूर्ण आहेत. त्यामुळे पात्र हरकतदारांची सुनावणी चालू महिन्यात पूर्ण करून त्याचा अहवाल महापालिका उपायुक्त (उद्यान) यांना पाठवण्यात येणार आहे. - सुखदेव येडवे, वृक्ष अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त - तुर्भे विभाग कार्यालय,नवी मुंबई महापालिका. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

जिल्हा वार्षिक योजनांच्या कामांचे प्रस्ताव तातडीने पाठवावेत -जिल्हाधिकारी अशोक शिनगारे