जिल्हा वार्षिक योजनांच्या कामांचे प्रस्ताव तातडीने पाठवावेत -जिल्हाधिकारी अशोक शिनगारे

ठाणे ः जिल्हा नियोजन समितीमार्फत देण्यात येणाऱ्या सन २०२२-२३ या वर्षातील जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण विशेष घटक योजनेतील कामे वेळेत पूर्ण होऊन शंभर टक्के निधी खर्च होण्यासाठी जिल्ह्यातील संबंधित कार्यान्वयीन यंत्रणांनी वेळेत प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिले आहेत.

जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीच्या पूर्वतयारीसंदर्भात जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली २ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील यंत्रणांची बैठक झाली. याप्रसंगी जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव, जिल्हा समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त समाधान इंगळे यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यापुढे जे अधिकारी जिल्हास्तरीय सभेत गैरहजर असतील त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्याबाबत जिल्हाधिकारी शिनगारे यांनी आदेशित केले.

जिल्हा नियोजन निधीतून आतापर्यंत झालेल्या खर्चाचा तसेच कामांचा यंत्रणानिहाय आढावा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी घेतला. सन २०२२-२३ या वर्षासाठी यंत्रणांना देण्यात आलेल्या निधीनुसार कामांसाठीचे प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव अद्याप बऱ्याच प्रमाणात अप्राप्त आहेत. सदर प्रस्ताव येत्या ५ नोव्हेंबर पर्यंत जिल्हा नियोजन समितीकडे पाठविण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी शिनगारे यांनी यावेळी दिले.

जिल्ह्याच्या विकासासाठी तसेच जिल्ह्यातील नागरिकांपर्यंत योजना पोहोचविण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनांचा निधी दिला जातो. सदर निधी वेळेत त्यांच्यापर्यंत पोहोचविणे यंत्रणांची जबाबदारी आहे. आतापर्यंत अनेक विभागांचे प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव आलेले नाहीत. वेळेत प्रस्ताव प्राप्त झाले नाही आणि निधी अखर्चित राहिला तर त्याची जबाबदारी संबंधित विभागप्रमुखांवर ठेवली जाईल. त्यामुळे या विभागानी तातडीने आराखडे तयार करुन प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव पाठवावेत. तसेच या वर्षीची प्रस्तावित कामे डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होतील, याकडेही यंत्रणा प्रमुखांनी लक्ष द्यावे. पुढील वर्षी सन २०२३-२४ साठी कोणती कामे घेण्यात येणार आहेत, याचाही आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी यावेळी दिल्या.

ठाणे जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसाठी इमारतीचे बांधकाम, प्रशिक्षण कार्यशाळा आदिंचा समावेश असलेला  बृहत्‌आराखडा सादर करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी शिनगारे यांनी बैठकीत दिले. प्रारंभी जिल्हा नियोजन अधिकारी जाधव आणि इंगळे यांनी आतापर्यंत आलेले प्रस्ताव, दिलेल्या प्रशासकीय मान्यता आणि वितरित निधींची माहिती सादर केली. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पनवेल बस डेपो मधील विविध समस्या प्रवाशांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलनाचे आयोजन