खारघर टेकडीवर वाघ?

खारघर ः खारघर डोंगरावर वाघ फिरत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने खारघर टेकडीवरील आदिवासी पाड्यांवर भीतीचे वातावरण पसरले आहे. खारघर डोंगरावर वाघ पहिल्याचे किरण पारधी या ग्रामस्थाकडून सांगितले जात आहे. तर खारघर डोंगरावर वाघ नसून अफवा असल्याचा दावा वनविभागाकडून केला जात आहे. घटना खरी असो अथवा अफवा मात्र वाघ खारघर परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.

खारघर डोंगरावरील रस्त्याच्या कडेला असलेल्या संरक्षण भिंतीवर दोन वाघ असल्याचा व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल झाल्यामुळे सकाळी-संध्याकाळी डोंगराच्या पायथ्याशी मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांनी सावधानता बाळगावी, असा सल्ला सोशल मीडियावर दिला जात आहे. दरम्यान, चार-पाच दिवसांपूर्वी रात्री आठ वाजताच्या सुमारास घरी जात असताना हाकेच्या अंतरावरुन वाघाला पाहिले, असे चाफेवाडी आदिवासी पाड्यात वास्तव्य करणारे किरण पारधी सांगत असल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. परंतु, खारघर डोंगरावर वाघ फिरत असल्याची अफवा आहे, असे पनवेल वन विभाग अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, खारघर डोंगरावर वाघ फिरत असल्याबाबत व्हिडीओ आणि पसरणाऱ्या बातम्यांमुळे खारघर डोंगरावरील आदिवासी पाडे आणि खारघर वसाहतीत भीतीचे वातावरण पसरले आहे.

सिडको खारघर डोंगरावर बंगला, रो हाऊस बांधण्याकरिता भूखंडांची विक्री करणार आहे. त्यामुळे खारघर डोंगरावरील आदिवासी पाड्यातील ग्रामस्थांनी भीतीपोटी घर खाली करुन दुसरीकडे वास्तव्यास जावे, म्हणून खारघर डोंगरावर वाघ फिरत असल्याची अफवा पसरविण्याचे कृत्य काही दलाल मंडळीकडून केले जात असावे, अशीही चर्चा खारघर मधील नागरिकांमध्ये सुरु आहे.

चार-पाच दिवसांपूर्वी रात्री आठ वाजताच्या सुमारास घरी जात असताना वाघ एका बैलाच्या मागे जात असल्याचे पाहिले. खारघर डोंगरावर वाघ येतात आणि निघून जातात. - किरण पारधी, ग्रामस्थ चाफेवाडी - खारघर.

 खारघर डोंगरावर संरक्षण भिंतीवर वाघ असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत असलेली संरक्षण भिंत खारघर डोंगरावरील नाही. तसेच अधिकाऱ्यांसमवेत खारघर डोंगरावर पाहणी केली असता, रस्त्यावर आणि डोंगरावर कुठेही वाघाच्या पायाचे ठसे आढळून आले नाहीत. - जनार्दन काळे, कर्मचारी, वन विभाग - खारघर.

‘सिडको'ने आयुर्वेदिक वनस्पती लागवडीसाठी खारघर टेकडीवर जागा दिली. खारघर टेकडीवर आवळा, काजू, शतावरी, शंखपुष्पी, अश्वगंधा, रिटा, जांभूळ, बेल, मोह आदी अनेक प्रकारची आयुर्वेदिक झाडे लावण्यात आल्यामुळे गेल्या २३ वर्षांपासून खारघर डोंगरावर दैनंदिन जाणे-येणे असते. मात्र, खारघर टेकडीवर कधीही वाघ, बिबटे निदर्शनास आले नाहीत. - अनिशा शेख, अध्यक्षा - स्पॅन विकास महिला ट्रस्ट, खारघर. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

विकास आराखडामध्ये प्रत्येक सेक्टर मध्ये हवी ई-चार्जिंग स्टेशन