बेलापूर मध्ये अवैध वृक्षतोड

वाशी ः एनआरआय पोलीस ठाणे मागील बेलापूर किल्ले गावठाण रस्त्यावरील सिडको अतिथी गृहापर्यंतच्या परिसरात अवैध वृक्षतोड करण्यात आली असून, या वृक्षतोडीचा पर्यावरणवाद्यांनी तीव्र निषेध व्यक्त करत विनापरवाना वृक्षतोड करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

नागरी क्षेत्रातील अवैध वृक्ष तोडीला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र नागरी वृक्ष संवर्धन जतन कायद्याअंतर्गत राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना आणि महामंडळाना आदेश निर्गमित केले आहेत. मात्र, या आदेशाची अंमलबजावणी करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने विना परवाना वृक्ष तोडीचे सत्र आजही नवी मुंबई शहरात मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. एनआरआय पोलीस ठाणे मागील बेलापूर किल्ले गावठाण रस्त्यावरील सिडको अतिथी गृहापर्यंतच्या परिसरात एका भुखंडावर अवैध वृक्षतोड करण्यात आली आहे. या प्रकारानंतर पर्यावरणाचा नाश करणाऱ्या व्यवतींविरुध्द कठोर कारवाई तसेच पुढची क्षती थांबवण्यासाठी निरंतर प्रयत्न करण्याची मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे.

बेलापूर किल्ले गावठाण मागे एका खाजगी भुखंडावर अवैध वृक्ष तोड केली गेली असून, या बाबत नवी मुंबई महापालिका बेलापूर विभाग अधिकाऱ्यांना अजिबात कल्पना नाही. - बी. एन. कुमार, संचालक - नॅटकनेक्ट फाउडेशन, नवी मुंबई.

सिडको आणि नवी मुंबई महापालिका या दोन्ही प्राधिकरणांना हरीत प्रभागात होणाऱ्या जमीनीच्या अधिग्रहणाच्या प्रकारांची सूचना देत आहोत. संबंधित अधिकाऱ्यांनी सतर्क असायला हवे आणि उल्लंघनांना थांबवायला हवे. - ॲड. प्रदीप पाटोळे

बेलापूर किल्ले गावठाण मागे एका खाजगी भुखंडावर करण्यात आलेल्या वृक्ष तोडीची पाहणी केली असून, सदर भूखंड धारकास नोटीस बजावण्यात आली आहे. - मिताली संचेती, सहाय्यक आयुक्त तथा बेलाूपर विभाग अधिकारी - नवी मुंबई महापालिका.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

खारघर टेकडीवर वाघ?