कोपरखैरणे टर्शिअरी ट्रिटमेंट प्लान्ट कार्यप्रणालीची आयुक्तांकडून पाहणी

नवी मुंबई ः महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार स्विकारल्यापासून राजेश नार्वेकर विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेत असून प्रकल्पस्थळांना भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी करीत आहेत. केंद्र सरकारच्या अमृत योजना अंतर्गत कोपरखैरणे येथे उभारण्यात आलेल्या प्रतिदिन २०द.ल.लि. क्षमतेच्या टर्शिअरी ट्रिटमेंट प्लान्टच्या कार्यप्रणालीची आयुक्तांनी बारकाईने पाहणी करीत तेथील पुर्नप्रक्रियाकृत पाण्याचा पूर्णतः वापर होण्याच्या दृष्टीने तत्पर कार्यवाहीचे निर्देश दिले.

सद्यस्थितीत या टर्शिअरी ट्रिटमेंट प्लान्टमधून निर्माण होणारे ६ लक्ष लिटर पुर्नप्रक्रियाकृत पाणी तुर्भे एमआयडीसीतील ६ उद्योगसमुहांना प्रायोगिक स्वरुपात पुरविले जात असून उर्वरित पुर्नप्रक्रियाकृत पाणी अधिक उद्योगसमुहांना देण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधून तत्पर कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश यावेळी आयुक्त राजेश नार्वेकर यांनी अभियांत्रिकी विभागाला दिले.

केंद्र सरकारच्या अमृत योजना अंतर्गत उभ्या राहिलेल्या सदर टर्शिअरी ट्रिटमेंट प्लान्टचा ५० टक्के खर्च केंद्र आणि राज्य शासनामार्फत उपलब्ध होत असून कोपरखैरणे प्रमाणेच ऐरोली येथेही प्रतिदिन २० द.ल.लि. टर्शिअरी ट्रिटमेंट प्लान्ट उभारण्यात आलेला आहे. नवी मुंबई महापालिकेची शहरात ७ ठिकाणी सी-टेक या अत्याधुनिक तंत्रप्रणालीवर आधारित मलप्रक्रिया केंद्रे असून त्यामधील प्रक्रियाकृत पाणी उद्याने, दुभाजकांमधील वृक्षराजी, चौकांमधील कारंजी अशा विविध गोष्टींसाठी वापरले जात आहे.

मलप्रक्रिया केंद्रातील सेकंडरी ट्रिटमेंट होऊन बाहेर पडणाऱ्या प्रक्रियाकृत सांडपाण्यावर अल्ट्रा फिल्टरेशन आणि अल्ट्रा व्हायलेट या प्रगत तंत्रज्ञानाद्वारे प्रक्रिया करुन टर्शिअरी ट्रिटमेंट प्लान्टमध्ये उद्योगसमुहांना उपयोगात आणता येईल अशा मानकाचे पुर्नप्रक्रियाकृत पाणी तयार केले जात आहे. अशा प्रकारचे प्रत्येकी २० द.ल.लि. क्षमतेचे २ टर्शिअरी ट्रिटमेंट प्लान्ट कोपरखैरणे आणि ऐरोली येथे उभारण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे उद्योगसमुहांना सदर पुर्नप्रक्रियाकृत सांडपाणी पुरविण्यासाठी एमआयडीसी भागात महापे येथे १.५ द.ल.लि. क्षमतेचा, घनकचरा प्रक्रिया प्रकल्पस्थळानजिक तुर्भे येथे २.५ द.ल.लि. क्षमतेचा आणि निब्बान टेकडी रबाले येथे ०.७५ द.ल.लि. क्षमतेचा अशा प्रकारे ३ ठिकाणी उच्चस्तरीय जलकुंभ उभारण्यात आले आहेत. या जलकुंभातील पाणी पातळीची माहिती टर्शिअरी ट्रिटमेंट प्लान्टमधील नियंत्रण कक्षात ऑनलाईन लाईव्ह दिसावी यादृष्टीने कार्यप्रणाली विकसित करण्याच्या सूचना आयुक्त राजेश नार्वेकर यांनी केल्या.

कोपरखैरणे येथील प्लान्टच्या भेटी दरम्यान आयुक्त राजेश नार्वेकर यांनी तेथील संपूर्ण कार्यवाहीची, तांत्रिक कार्यप्रणालीची पाहणी करीत सविस्तर माहिती घ्ोतली. याप्रसंगी शहर अभियंता संजय देसाई, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, अतिरिक्त शहर अभियंता मनोज पाटील, कार्यकारी अभियंता अजय संख्य, विजय राऊत, कोपरखैरणे विभाग अधिकारी प्रशांत गावडे आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, नवी मुंबई महापालिका राबवित असलेले प्रकल्प, उपक्रम नाविन्यपूर्ण असतात, अशी आपल्या शहराची ओळख आहे. त्यामुळे ओळख अधिक दृढ करण्यासाठी प्रत्येक बाबतीत कल्पकतेचा वापर व्हावा. यामधून शहराचा नावलौकीक वाढविण्यासाठी प्रयत्न केला जावा अशा सूचना आयुक्त राजेश नार्वेकर यांनी भेटीप्रसंगी अधिकाऱ्यांना दिल्या.

निसर्गोद्यानातील मियावाकी उद्यानाची संकल्पना अत्यंत अभिनव असून शहरात आणखी काही ठिकाणी  संकल्पना अंमलात आणून शहरातील हरित क्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने पाहणी करुन तशा प्रकारची स्थळे सूचवावीत. निसर्गोद्यानातील स्वच्छता पार्क अत्यंत अभिनव संकल्पना असून शालेय विद्यार्थ्यांच्या जास्तीत जास्त अभ्यास सहली याठिकाणी आयोजित करण्याच्या दृष्टीने महापालिका मार्फत पुढाकार घेतला जावा. याठिकाणी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात सहजपणे स्वच्छतेचे महत्व रुजविण्याच्या दृष्टीने खेळ, माहितीपट, ऑडियो व्हिज्युअल माध्यम अशा विविध सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. -राजेश नार्वेकर, आयुवत-नवी मुंबई महापालिका. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

बेलापूर मध्ये अवैध वृक्षतोड