मानाच्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेला शुक्रवारपासून होणार प्रारंभ

पनवेल ः श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा आणि चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाही मानाची ‘अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका' स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे यंदा नववे वर्ष आहे. स्पर्धेचे मुख्य प्रायोजक ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट्‌स प्रा. लिमिटेड तर सहप्रायोजक नील ग्रुप आहे. स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला येत्या ४ नोव्हेंबर २०२२ पासून विभागनिहाय प्रारंभ होणार आहे. ‘अटल करंडक एकांकीका स्पर्धा'ची अंतिम फेरी २ ते ४ डिसेंबर २०२२ दरम्यान पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार आहे.  

नाटय चळवळ वृध्दींगत करण्यासाठी आणि नाटय रसिकांना त्यांचे नाटयाविष्कार प्रदर्शित करता यावे, त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे तसेच देशाच्या विकासासाठी सदैव धडपडणारे भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचारांचा वारसा वृध्दींगत व्हावा, या उद्देशाने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद'चे पनवेल शाखा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उपाध्यक्ष परेश ठाकूर यांनी ‘अटल करंडक एकांकीका स्पर्धा' या दर्जेदार स्पर्धेचा प्रारंभ केला. नामवंत, उमदे आणि हौशी कलावंत या स्पर्धेकडे नेहमीच आकर्षित होतात. स्पर्धेचे देखणे आणि निटनेटके संयोजन, आकर्षक पारितोषिके, दर्जेदार परिक्षण आणि सर्वोत्तम स्पर्धा स्थळ यामुळे ‘अटल करंडक एकांकीका स्पर्धा' नाट्य रसिकांची आवडती स्पर्धा बनली आहे. दरवर्षी या स्पर्धेला राज्यातील कलाकार आणि प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभत असतो. त्यामुळे ‘अटल करंडक एकांकीका स्पर्धा' राज्यात नावाजली असून, स्पर्धेतील विजेत्या एकांकिकांना यंदाही भरघोस रक्कमेचे पारितोषिक तसेच प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह प्रदान करुन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. स्पर्धेच्या प्रमुख बक्षिसांचे प्रायोजक श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ तर वैयक्तीक आणि विशेष बक्षिसांचे प्रायोजक नील ग्रुप आहे.

‘अटल करंडक एकांकीका स्पर्धा'च्या अंतिम फेरीकरिता विशेष पारितोषिके ठेवण्यात आली असून, सर्वोत्कृष्ट विनोदी एकांकिका, महाराष्ट्रातील अस्सल मायबोली एकांकिका, लोककलेवर आधारित एकांकिका, सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकार आणि बाल कलाकार यांनाही विशेष पारितोषिकांनी सन्मानित करण्यात येणार आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महापालिकेने शहरासाठी जास्तीत जास्त खुल्या जागा ठेवण्याची ‘सिडको'ला विनंती करण्याची मागणी