परवडणारी घरे ठरणार रडवणारी घरे ?

नवी मुंबई -: तळोजा नोड नवी मुंबईतील वास्तव्यासाठी सर्वोत्तम पर्याय असल्याचा टेंभा सिडको मिरवत आहे. प्रत्यक्षात मात्र हा परिसर राज्यात सर्वाधिक प्रदूषण असल्याने भविष्यात येथील रहिवाशांना श्वसन विकारांना निमंत्रण देणारा ठरणार आहे. रासायनिक औद्योगिक वसाहतीत हे प्रकल्प उभे केल्याने भविष्यात नाक मुठीत धरून वास्तव्य करावे लागणार आहे.त्यामुळे  सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी घरे ही रडवणारी घरे ठरण्याची शक्यता आहे.

सिडकोने तळोजा येथे विविध ठिकाणी गृहनिर्माण प्रकल्प निर्माण केले असून काही प्रकल्प  सुरू आहेत. तर काही प्रकल्प नियोजित आहेत. मात्र हे प्रकल्प तळोजा रासायनिक औद्योगिक केंद्राच्या परिसरात असल्याने सिडको लोकांच्या जीवाशी खेळत असल्याची भावना व्यक्त होत आहे. नियोजित तळोजा मेट्रो रेल्वे स्थानकाच्या सभोवताली कासाडी नदीच्या आसपास हा गृहनिर्माण प्रकल्प साकारत आहे. तीन वर्षापूर्वी सर्वाधिक प्रदूषण असणाऱ्या परिसरात सिडकोने घरे बांधण्याचा उद्योग सुरू केला आहे. याठिकाणी आधीच प्रदूषण निर्माण करत असल्याबद्दल राष्ट्रीय हरित लवादाने दहा कोटी रुपयांचा दंड ठोठावला असून मलनिःसारण केंद्राचा निर्मितीसाठी सिडकोला निर्देश देण्यात आले आहेत. मात्र यानंतर देखील नियोजित गृहनिर्माण प्रकल्प परिसरात दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरेसा निचरा होत नसल्याने प्रदूषणाचा आणि आरोग्याचा प्रश्न कायम आहे. तसेच पर्यावरण विभागाच्या मार्गदर्शन प्रणालिकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. सिडको मोकळ्या भूखंडावर प्रकल्प साकारत असताना या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने याचा फटका घर विक्रीला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 स्वस्त घरांसाठी तळोजा नोड हा  पर्याय ठरू शकतो. अशी जाहिरातबाजी करून नागरिकांना प्रदुषणयुक्त परिसरात लोटण्याचे पातक सिडको करीत आहे.वायू आणि जल प्रदूषण यासाठी संवेदनशील असणारा हा परिसर ध्वनी प्रदूषणाची पातळी मर्यादा ओलांडणाऱ्या संवेदनशील परिसरात देखील मोडत आहे. महामार्ग यामुळे होणारी वाहतूक कोंडी आणि औद्योगिक परिसरातील अवजड वाहतूक ही डोकेदुखी ठरणार आहे.

   तळोजा हा नवी मुंबईतील वास्तव्यासाठी सर्वाधिक डोकेदुखीचा नोड ठरणार आहे. या नोडमध्ये विविध उत्पन्न गटांतील नागरिकांकरिता मोठ्या प्रमाणावर घरे उपलब्ध होणार आहेत. जवळपास नऊ हजाराच्या आसपास घरे ही थेट औद्योगिक परिसरातच आहेत. या नोडमधील ५.१ हेक्टर क्षेत्र शाळा, पदवी महाविद्यालये, प्रार्थनास्थळे, रुग्णालये, समाजकेंद्रे, वसतिगृहे  यासाठी राखीव ठेवली असून या ठिकाणी देखील प्रदूषणाचा सामना करावा लागणार आहे. मेट्रो रेल्वेच्या स्थानकांलगत वाणिज्यिक उपक्रमांकरिता २० हेक्टर क्षेत्र सिडकोकडून निश्चित करण्यात आले आहे. जे अगदी औद्योगिक वसाहतीला खेटून आहे. यामुळे तळोजा नोडमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रदूषण समस्येला हजारो लोकांना सामोरे जावे लागणार असून यासाठी सिडको प्रशासनाने कोणतीही उपाययोजना केली नसल्याने भविष्यात ही समस्या आणखी बिकट होणार आहे.सिडकोच्या नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील मेट्रो आगार तळोजा येथे असल्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांचा वावर असणार आहे. तळोजा-खारघर मार्ग, कळंबोली-शीळफाटा मार्गाचे रुंदीकरण, उड्डाणपुलांचे बांधकाम या कामांमुळे तळोजा नोड प्रमुख महामार्गांना जोडला जाणार असल्याने वाहतूक कोंडी ध्वनी प्रदुषण ही ज्वलंत समस्येचे रूप धारण करण्याची शक्यता आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासूनही हा नोड नजीकच्या अंतरावर असल्याने रस्त्यांचे जाळे पुरेसे ठरण्यास अडचण आहे. याबाबत नियोजनाचा अभाव दिसत आहे. याच कारणांमुळे सिडकोने निर्माण केलेल्या पायाभूत सुविधांच्या पुरेशा नियोजनामुळे आजमितीस वाहतूक कोंडी आणि पार्किंगची समस्या भीषण झाली असताना यात आणखी भर पडणार आहे. मुंबईपासून जवळच असलेल्या तळोजा औद्योगिक वसाहतीत कारखाना सुरू करण्यास अनेक उद्योजक उत्सुक असतात. एमआयडीसीत ३५० पेक्षा अधिक कारखाने रासायनिक आहेत. या परिसरात सिडकोचा हा गृहप्रकल्प साकारत आहे. १२ एप्रिल २०१८ ची आकडेवारी नुसार  महाराष्ट्रात सर्वाधिक जलप्रदूषित असणारी औद्योगिक वसाहत म्हणून तळोजा असल्याचे सिद्ध होते. यात अजून फारसा फरक पडलेला नसताना सिडको याठिकाणी मोठ मोठे गृहप्रकल्प बनवत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. प्रदूषित पाणी नदीत सोडल्यामुळे कासाडी नदीपासून खारघर, कामोठे खाडीतील मासे मरण्याच्या घटना अनेकवेळा घडतात. ही कसाडी नदी आणि सिडकोचा गृहप्रकल्प शेजारीच आहे याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी सिडको जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद लाभला नाही.

एखाद्या भागात जर सतत वायू प्रदूषण होत असेल तर या प्रदूषणाच्या वासामुळे नागरिकांच्या फुफ्फुसावर परिणाम होऊन आरोग्य धोक्यात येऊ शकते. तर वायू प्रदुषणामुळे लहान मुलांना अधिक धोका होऊ शकतो.- डॉ.नीलेश चींचकर , श्वसन विकार तज्ञ,

२०१८ साली सिडकोच्या सोडतीत आम्हाला तळोजा येथे  घर लागले होते. मात्र प्रत्यक्षात येथील भौगोलीक परिस्थिती आणि प्रदूषणाची पातळी पाहिली असता आम्ही आमचे घर न घेण्याचा निर्णय घेत सदर घर सेलेंडर केले. मनीषा भोईर, वाशी, नवी मुंबई.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मानाच्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेला शुक्रवारपासून होणार प्रारंभ