‘महावितरण'ची आंतर परिमंडलीय नाट्य स्पर्धा २ नोव्हेंबर पासून

नवी मुंबई ः ‘महावितरण'ची कोकण प्रादेशिक आंतर परिमंडलीय नाट्य स्पर्धा वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात उद्या २ नोव्हेंबर पासून आयोजित करण्यात आली आहे. तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत एकूण सहा नाट्य प्रयोग सादर करण्यात येणार असल्याची माहिती महावितरण कोकण प्रादेशिक विभागाचे सह-व्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांनी दिली आहे.

महावितरण कंपनीत कार्यरत अधिकारी आणि कर्मचारी वर्गाच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी नाट्य स्पर्धा दरवर्षी घण्यात येते. मागील दोन वर्षापासून कोरोना साथ रोगामुळे सदर स्पर्धा स्थगित करण्यात आली होती. आता सर्व निर्बंध हटविण्यात आल्याने पुन्हा नव्या जोमाने नाट्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

नाट्य स्पर्धेत दररोज दोन नाट्य प्रयोग सादर करण्यात येणार आहे. महावितरण कोकण प्रादेशिक कार्यालय अंतर्गत येणाऱ्या भांडूप, कल्याण, रत्नागिरी, नाशिक आणि जळगाव परिमंडळाच्या वतीने प्रत्येकी एक नाट्य प्रयोग सादर करण्यात येणार आहे. तसेच मुख्यालयातर्फे एक नाटक असे एकूण सहा नाटक सादर करण्यात येणार आहेत.२ नोव्हेंबर रोजी लेखक मनोहर सोमण लिखीत 'द गेम' भांडूप परिमंडलाद्वारे तर प्रेमानंद गज्वी लिखित व्याकरण नाटक कल्याण परिमंडलाद्वारे सादर करण्यात येणार आहे. ३ नोव्हेंबर रोजी डॉ. समीर मोने लिखित नाटक उदकशांत रत्नागिरी परिमंडलाद्वारे तर इरफान मुजावर लिखित नाटक सलवा जुलूम सांघिक कार्यालयातर्फे  सादर करण्यात येणार आहे. डॉ. राजेंद्र धामणे लिखित नाटक मथुरेचा बाजार नाशिक परिमंडलाद्वारे तर शेवटचे नाटक सोमनाथ नाईक यांनी लिहिलेला अर्यमा उवाच जळगाव परिमंडलाद्वारे सादर करण्यात येणार आहे. सदर नाट्य स्पर्धा योग्य प्रकारे पार पाडण्यासाठी भांडूप परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत.

नाट्य रसिकांसाठी ‘महावितरण'ची नाट्य स्पर्धा मेजवानी आहे. कोणत्याही नाट्य प्रयोगाला शुल्क आकारले जाणार नाही. रसिकांना निःशुल्क प्रवेश दिला जाणार आहे. म्हणून नाट्य रसिकांनी याचा भरपूर आनंद घ्यावा, असे आवाहन ‘महावितरण'कडून करण्यात आले आहे. 

 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

परवडणारी घरे ठरणार रडवणारी घरे ?