तिरंगी मानवी एकता साखळी करित नमुंमपा अधिकारी, कर्मचा-यांनी दिला एकतेचा संदेश

नवी मुंबई ः ‘राष्ट्रीय एकता दिन'चे औचित्य साधून नवी मुंबई महापालिका मुख्यालयासमोरील सर्व्हीस रोडवर महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या समवेत सर्व अधिकारी, कर्मचारीवृंद यांनी मानवी एकता साखळी करुन राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश प्रसारित केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या पंचप्राण संकल्पनेत एकता अशी एक महत्वाची संकल्पना आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशातील एकता आणि अखंडतेसाठी अनमोल योगदान दिले आहे. त्यांच्या देशभक्तीचा यथोचित सन्मान करण्यासाठी शासन निर्देशानुसार एकतेचा उत्सव साजरा करण्यात येत आहे.

या अनुषंगाने एकता दिन निमित्त महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनानुसार शहरात विविध ठिकाणी नागरिकांच्या सहभागाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी-कर्मचारी यांनी एकतेचा संदेश प्रसारणासाठी अभिनव पध्दतीने तिरंगी मानवी एकता साखळीचे आयोजन करुन राष्ट्राची एकता आणि अखंडता समर्थ राखण्यासाठी एकतेचे आवाहन केले. वास्तुरचनेचा देशातील एक उत्तम नमुना असणाऱ्या महापालिका मुख्यालयच्या आयकॉनिक वास्तुसमोर सर्व्हिस रोडवर महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्यासह अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, संजय काकडे आणि सर्व विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी यांनी या मानवी एकता साखळीत सहभागी होत हातात सलग तिरंगा पकडून राष्ट्रभक्तीचे एकात्म दर्शन घडविले. पावसाळी कालावधीत लावला न जाणारा लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस्‌ मध्ये नोंदीत २२५ फुट उंचीच्या ध्वजस्तंभावरील प्रतिकात्मक राष्ट्रध्वजही ‘एकता दिन'चे औचित्य साधून फडकविण्यात आला.


सरदार वल्लभभाई पटेल यांच्या देशभक्तीचा सन्मान करतानाच त्यांच्या एकात्म तसेच अखंड भारताच्या विचारांची आणि मूल्यांची जपणूक करण्याचा संदेश प्रसारित करीत महापालिका अधिकारी, कर्मचारी यांच्यासह नवी मुंबईकर नागरिकांनीही एकता दिन निमित्त आयोजित उपक्रमांमध्ये सहभागी होत एकात्मतेचे दर्शन घडविले. 

 

 

 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

दक्षता जनजागृती सप्ताह