नागरिक व विद्यार्थ्यांनी नवी मुंबईत विविध ठिकाणी एकता दौडच्या माध्यमातून दिला एकात्मतेचा संदेश

नवी मुंबई ः शासन निर्देशानुसार नवी मुंबई महापालिकेच्या वतीने एकात्मतेचा संदेश प्रसारित करणा-या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या संदेश प्रसारणाला लोकसहभागाची जोड देत महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनानुसार ‘एकता दौड'चा अभिनव उपक्रम आयोजित करण्यात आला होता.


यामध्ये ‘श्री करियर ॲकॅडमी'च्या सहयोगाने ज्वेल ऑफ नवी मुंबई ते महापालिका मुख्यालय येथे ‘एकता दौड'चे आयोजन करण्यात आले होते. अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले आणि परिमंडळ-१चे उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार, परवाना विभागाचे उपायुक्त डॉ. श्रीराम पवार यांच्या नियोजनानुसार आयोजित करण्यात आलेल्या ‘एकता दौड'मध्ये ३०० हून अधिक युवक, युवतींनी उत्साहाने सहभागी होत देशभक्तीपर घोषणा देत राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश प्रसारित केला.


त्याचप्रमाणे मिनी सी-शोअर वाशी येथे लेटस्‌ सेलिब्रेट फिटनेस या संस्थेच्या सहयोगाने संस्था प्रमुख रिचा समित यांच्यासह १२५ हून अधिक नागरिक ‘एकता दौड'मध्ये सहभागी झाले. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे आणि वाशी विभाग अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त दत्तात्रय घनवट यांनी या ‘दौड'चे सुयोग्य नियोजन केले.


याशिवाय शिक्षण विभागाचे उपायुक्त योगेश कडुसकर आणि शिक्षणाधिकारी अरुणा यादव यांच्या नियंत्रणाखाली महापालिकेच्या शाळांमध्येही ‘एकता दौड'चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ३० प्राथमिक आणि २३ माध्यमिक शाळांमधील ५ हजार हून अधिक विद्यार्थ्यांनी आपापल्या शाळांच्या परिसरात ‘एकता दौड'च्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश प्रसारित केला.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

तिरंगी मानवी एकता साखळी करित नमुंमपा अधिकारी, कर्मचा-यांनी दिला एकतेचा संदेश