आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी लुटली दिवाळी पहाटचा आनंद 

नवी मुंबई: : पाँप आणि रँपच्या जमान्यात शंकर नाथा प्रतिष्ठानने आपली मराठमोळी संस्कृती जपत आज ठाण्यात सुरमयी दिवाळी पहाट साजरी केली. ओम नमोजी आद्या... उठी उठी गोपाळा... काठी न घोंगड घेऊ द्या कि र... अशा मंगलाचरण, भुपाळी अन लोकगीतांच्या हिंदोळ्यावर काशीनाथ घाणेकर थियटरमध्ये सुरांची बरसात झाली. ठाणेकर रसिकांबरोबरच येऊरच्या विवेकानंद आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी खास उपस्थित राहून कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. 

ठाणेकर रसिकांसाठी गंध स्वरांचा प्रस्तुत सुरमयी दिवाळी पहाट या मराठमोळ्या गाण्यांचा कार्यक्रम काशिनाथ घाणेकर थिएटरमध्ये आयोजित केला होता. गायिकातथा नवी मुंबई पोलीस आयुक्तालय मधील पोलीस उपायुक्त  रुपाली अंबुरे, गायक अतुल बेले यांनी जुन्या पण अजरामल असलेल्या गाण्यांच्या गाठोड्यातील वेगवेगळ्या थाटणीची गाणी सादर करत रसिकांची रविवारची पहाट सुमधुर केली. मोगरा फुलला...घनशाम सुंदरा, अरुणोउदय झाला... आजी सोनियाचा दिनू...गगन सदन तेजोमय... झुलतो बाई रात झुला अशी दर्जेदार गाणी सादर होत गेली आणि रसिकही मंत्रमुग्ध झाले. पहाटेच रसिकांनी सदाबहार अस्सल मराठमोळ्या गाण्यांचा आस्वाद घेण्यासाठी थिएटरमध्ये गर्दी केली होती. हाऊसफुल झालेल्या या कार्यक्रमाला येऊर येथील विवेकानंद बाल आश्रम शाळेतील विद्यार्थांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. आजच्या रँप साँगच्या जमान्यातही जुन्या साठवणीतली अन अंगात रोमांच आणणाऱ्या या गीतांनी विद्यार्थांनाही एका जागेवर खिळवून ठेवले. गायकांना वादकांनीही तितक्याच ताकदीने साथ दिल्याने प्रत्येक गाण्याला टाळ्या, शिट्या आणि वन्समोरची दाद रसिकांकडून देण्यात आली. 

यावेळी शंकर नाथा प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा ईश्वर खैरमोडे,  सोनाली लोखंडे व पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे  यांनी आश्रमशाळेला दिवाळी भेट म्हणून अर्थसहाय्य केले. आश्रम शाळेच्या विश्वस्त प्राची कसबेकर तसेच मनिष शहाणे यांनी मुलांना दिवाळी पहाट कार्यक्रमाचा मनमुराद आस्वाद घेण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रतिष्ठानचे आभार मानले. प्रथमेश पाठक याने सुत्रसंचालन करून कार्यक्रमाच्या गोडव्यात अधिकच भर घातली.  

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

आ.मंदाताई म्हात्रे यांची ज्येष्ठ नागरिकांसोबत दिवाळी