दिवाळी साहित्य  प्रदर्शन विक्री केंद्रातून महिलांना आर्थिक पाठबळ

नवी मुंबई-: मागील दोन वर्षे करोना काळात सर्व सामान्य नागरिकांची  आर्थिक परिस्थिती पुरती खालावली होती तर काहींचे रोजगार गेले होते. त्यामुळे यंदा  शहरातील महिलांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिक पाठबळ मिळावे म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने  महिला बचत  गटांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामध्ये   दिवाळी फराळ, कंदील, पणत्या आदी साहित्य विक्रीसाठी प्रदर्शन विक्री केंद्र उपलब्ध केले आहेत. 

नवी मुंबई महापालिकेच्या समाज विकास विभागाने महिलांना बचत गटाच्या माध्यमातून स्वयंरोजगार करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करण्याचा निश्चय करण्यात आला. त्या अनुषंगाने नवी मुंबई शहरातील बेलापूर, नेरुळ,  वाशी, तुर्भे , कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, दिघा, सानपाडा या ठिकाणी एकूण ४३ प्रदर्शन विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहेत. या विभागातील रेल्वे स्थानक परिसर, मुख्य रस्ता लगत तसेच वर्दळीच्या ठिकाणी महिलांकरता हे स्टॉल उपलब्ध करून दिले आहेत.  या प्रदर्शन विक्री स्टॉलच्या माध्यमातून महिलांना दिवाळी फराळ, कंदील, पणत्या  इत्यादी दिवाळी साहित्य विक्रीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. करोना काळात सर्वच उद्योग धंदे, व्यवसाय ठप्प झाले होते. त्यामुळे कित्येकांचे रोजगार गेले होते, तर काहींना आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते. यंदा अधिक उत्स्फूर्तपणे दिवाळी सण साजरा करण्यात येत आहे. त्यामुळे मागील दोन वर्षे आर्थिक नुकसान झाले असून  बचत गटातील महिलांना  त्यांनी बनवलेल्या वस्तू, फराळ इत्यादी साहित्य विक्री करून आर्थिक हातभार लागेल या हेतूने नाममात्र दरात विक्री केंद्र उपलब्ध केले आहे, अशी माहिती समाज विकास विभागाचे उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांनी दिली आहे.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

तांत्रिक अडचणी मुळे आनंदाची दिवाळी ऐवजी  नाराजीची दिवाळी