पर्यावरणपुरक, प्रदुषणमुक्त दिवाळी साजरी करा
नवी मुंबई ः भारत सरकारच्या अधिसुचना अन्वये १२५ डीबी (एआय) पेक्षा जास्त आवाज निर्माण करणाया फटाक्यांचे उत्पादन, विक्री किंवा वापर करणे बेकायदेशीर आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार बेरियम सॉल्ट, लिथीयम, अर्सेनिक, लीड यासारखे घटक असणारे फटाके वापरण्यासही बंदी आहे. सदर घटकांमुळे विषारी वायू तयार होतात. ते वायू प्राणी व वनस्पती या दोघांनाही घातक आहेत.
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार फटाका विक्रेत्यांनी विस्फोटक-अधिनियम १८८४ आणि त्या अंतर्गत केलेले विस्फोटक नियम २००८ मधील प्रतिबंध-नियम यांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. त्यानुसार फटाके विक्रेत्यांनी बंदी असलेले फटाके विक्री करावयाची नाही. तसेच परवानगी असलेले फटाके महापालिकेने निश्चित केलेल्या ठिकाणी परवानगी घेऊनच विक्री करावयाची आहे.
महाराष्ट्र शासनाचे ‘माझी वसुंधरा अभियान ३.०' ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२३' आणि ‘स्वच्छ वायू सर्वेक्षण अभियान' अंतर्गत नागरिकांनी फटाकेमुक्त, प्लास्टीकमुक्त, कचरामुक्त, प्रदुषणमुक्त आणि पर्यावरणपुरक (ग्रीन फेस्टिवल) सण-उत्सव साजरे करावेत. नागरिकांनी फटाक्यांचा वापर टाळावा. प्लास्टीकचा वापर टाळून कापडी किंवा कागदी पिशवीचा वापर करावा. तसेच सण-समारंभामध्ये टाकाऊ वस्तुंचा आणि पुनर्वापर करण्यायोग्य वस्तुंचा वापर जास्तीत जास्त प्रमाणात करावा. त्याअनुषंगाने पर्यावरणपुरक, प्रदुषणमुक्त दिवाळी साजरी करावी.
नवी मुंबईकर नागरिकांनी दीपोत्सव हरित आणि पर्यावरणपुरक तसेच सुरक्षितरित्या साजरा करावा, असे आवाहन करण्यात येत आहे. नवी मुंबईकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! -राजेश नार्वेकर, आयुवत-नवी मुंबई महापालिका.