आग्रोळी गावातून शिधापत्रिकाधारकांना धान्य किट वाटपाला सुरुवात
नवी मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिधाधारकांना १०० रुपयांना धान्य किट वितरण करण्याचे जाहीर केले. त्याअनुषंगाने ‘बेलापूर'च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते बेलापूर मधील आग्रोळी गावातील शिधावाटप केंद्रातून धान्य किट वाटपाला सुरुवात करण्यात आली आहे. याप्रसंगी नवी मुंबई महापालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्या सौ. सरोज पाटील, माजी नगरसेविका राजेश्री कातकरी, ‘बाळासाहेबांची शिवसेना'चे उपजिल्हाप्रमुख रोहिदास पाटील, सुभाष गायकवाड, सुधीर पाटील, निलेश पाटील, विनोद डोंगरे, संदीप पाटील तसेच शिधावाटप निरीक्षक शीतल लाडके, अमोल बराटे, केंद्र चालक प्रमोद कंबोटकर तसेच लाभार्थी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस साहेब यांनी महाराष्ट्रामध्ये गोरगरीबांची दिवाळी सुखमय आणि चांगली आनंदात जावी, या हेतुने केवळ १०० रुपयांमध्ये धान्य किट गोरगरीबांसाठी शिधावाटप केंद्राच्या माध्यमातून उपलब्ध केले आहेत. नवी मुंबईत त्याची सुरुवात आग्रोळी गावातून सुरुवात होत आहे, असे आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी यावेळी सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षांनंतर दिवाळी साजरी होत असल्याने नागरिकांना वेळेत धान्य मिळाल्याने त्यांची दिवाळी आनंदमयी होणार आहे. लाभार्थी असूनही धान्य किट न मिळाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास दुकानदारांवर कारवाई करण्याचा इशाराही यावेळी त्यांनी दिला. महत्वाचे म्हणजे दिवाळी प्रदुषण मुक्त, फटाके उडवताना काळजी घेऊन साजरी करण्याचे आवाहन देखील आमदार सौ.मंदाताई म्हात्रे यांनी नवी मुंबईकर नागरिकांना केले आहे.