प्ले-वेस्ट सेग्रीगेशन गेमद्वारे मुलांवर कचरा वर्गीकरणाचे हसत खेळत संस्कार

नवी मुंबई ः घनकचरा व्यवस्थापनातील सर्वात महत्वाचा भाग कचऱ्याचे निर्मितीच्याच ठिकाणी केले जाणारे ओला, सुका आणि घरगुती घातक असे तीन प्रकारे वर्गीकरण असून नवी मुंबईकर नागरिक यामध्ये स्वयंस्फुर्तीने कचरा वर्गीकरण करण्यासाठी पुढाकार घेताना दिसतात.

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशनमार्फत ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२३' अंतर्गत ओला आणि सुका कचरा याविषयी व्यापक स्वरुपात जनजागृती करण्यासाठी स्वच्छता के दो रंग अशी मोहीम १७ ते २२ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्याचे निश्चित करण्यात आले असून त्या अनुषंगाने नवी मुंबई महापालिकेने याकामी आघाडी घेतली आहे.

याबाबत मुलांमधील मोबाईल गेम्सची आवड लक्षात घेऊन हसत खेळत कचरा वर्गीकरणाचे महत्व मुलांपर्यंत पोहोचविण्यासाठी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या शुभहस्ते इन्स्टाग्रामवर प्ले-वेस्ट सेग्रीगेशन (सेग्रीगेट युअर वेस्ट) असा कचरा वर्गीकरणाविषयीचा स्पेशल गेम लाँच करण्यात आला. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त तथा ‘स्वच्छ भारत मिशन'चे नमुंमपा नोडल अधिकारी डॉ. बाबासाहेब राजळे उपस्थित होते.

या गेममध्ये ओल्या कचऱ्यामध्ये कोणते घटक येतात आणि सुक्या कचऱ्यामध्ये कोणते घटक येतात याविषयीचे मुलांचे ज्ञान जाणून घेण्यात येणार आहे. इन्स्टाग्रामवर लाँच केलेल्या प्ले-वेस्ट सेग्रीगेशन (सेग्रीगेट युअर वेस्ट) गेम खेळण्यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या @nmmconline  या इन्स्टाग्राम पेजवर जाऊन अथवा https://www.instagram.com/ar/634271571616316 ऑनलाईन लिंकवर जाऊन सहजपणे कचरा वर्गीकरणाचा गेम खेळता येऊ शकतो.

या गेमच्या सुरुवातीला लिंकवर क्लिक केल्यानंतर गेम खेळणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यावर मुकुट दिसू लागेल. त्या मुकुटाच्या एका बाजुला ओलू म्हणजे ओला कचरा आणि दुसऱ्या बाजुला सुकू म्हणजेच सुका कचरा याचे आयकॉन दिसतील. मुकुटाच्या मध्यभागी एकेक करून कागद, फुले, फळे अशा साहित्याची नावे दिसतील. त्यामधील ओल्या कचऱ्यात जाणारे साहित्य कुठले आणि सुक्या कचऱ्यात जाणारे साहित्य कुठले ते ओळखून मुलांनी डाव्या किंवा उजव्या बाजुला मान झुकवली की योग्य उत्तरानुसार त्यांना मिळालेले गुण प्रदर्शित होतात. यामुळे मुलांना कोणता कचरा कोणत्या डब्यात याविषयीचे कचरा वर्गीकरणाचे आपोआप ज्ञान मिळणार असून हसत खेळत कचरा वर्गीकरणाची माहिती प्राप्त होणार आहे.  

लहान वयापासूनच मुलांवर स्वच्छतेचे संस्कार करण्यासाठी नवी मुंबई महापालिका आरंभापासूनच कार्यरत आहे. या अनुषंगाने सीबीडीतील राजीव गांधी स्टेडियम येथे नुकत्याच झालेल्या इंडियन स्वच्छता लीगच्या भव्यतम विक्रमी कार्यक्रमात नवी मुंबई इको क्नाईटस्‌ संघाचे कर्णधार, सुप्रसिध्द गायक संगीतकार पद्मश्री शंकर महादेवन यांच्या उपस्थितीत घनकचरा वर्गीकरणाविषयी जनजागृतीपर व्हिडिओ क्लिपचे अनावरण करण्यात आले होते.

लहान मुलांमध्ये असलेली काटर्ुन्सची आवड लक्षात घेऊन या व्हिडिओ क्लिपमध्ये ओल्या कच-यासाठी ओलू आणि सुक्या कचऱ्यासाठी सुकू कचऱ्याच्या डब्याच्या आकाराची दोन काटर्ुन पात्रे प्रदर्शित करण्यात आली होती. याद्वारे उरलेले अन्नपदार्थ, फळांच्या साली, भाज्या, फुले असा कचरा ओलू म्हणजेच ओला कचरा आहे आणि कागद, काच, टाकाऊ स्टेशनरी साहित्य, धातूचे साहित्य असे सर्व सुकू म्हणजेच सुका कचरा आहे अशी महत्वाची माहिती काटर्ुन्सद्वारे मुलांपर्यंत पोहोचविण्यात आली होती. याशिवाय डायपर, सिरींज, सॅनिटरी नॅपकीन असे साहित्य घातकू म्हणजेच घरगुती घातक कचरा आहे, अशी माहिती काळ्या रंगाचा काटर्ुन पात्र स्वरुपातील कचऱ्याचा डबा प्रदर्शित करीत मुलांना देण्यात आलेली होती.

केंद्र सरकारच्या स्वच्छता के दो रंग या मोहिमेअंतर्गत ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवण्याविषयी ओलू आणि सुकू ‘सुकू” या नवी मुंबई महापालिकेने प्रदर्शित केलेल्या कार्टुन पात्रांची मुलांमधली लोकप्रियता लक्षात घेऊन तसेच मुलांना असलेली मोबाईल गेमची आवड लक्षात घेऊन वैशिष्ट्यपूर्ण रितीने प्ले-वेस्ट सेग्रीगेशन या इन्स्टाग्रामवरील खेळाची रचना करण्यात आलेली आहे. नवी मुंबईतील मुले स्वतः सदर खेळ खेळून ओल्या कचऱ्यात कोणते साहित्य आणि सुक्या कचऱ्यात  कोणते साहित्य याविषयी आपल्याला असलेल्या माहितीची खेळाद्वारे खातरजमा करुन घेतलीच; याशिवाय आपल्या पालकांनाही सदर खेळ खेळायला लावून त्यांनाही कचरा वर्गीकरणाचे महत्व जाणवून देतील, असा विश्वास वाटतो. -राजेश नार्वेकर, आयुवत-नवी मुंबई महापालिका. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सिडको'मध्ये ‘व्यवसाय सुलभता कक्ष' सुरु