रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते वृक्ष दत्तक योजनाचा शुभारंभ 

पनवेल : रयत शिक्षण संस्थेच्या मोखाडा येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात वृक्ष दत्तक योजना महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आली असून या योजनेचा शुभारंभ महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन व रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य  रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आज (गुरुवार, दि. २०) महाविद्यालयाच्या प्रांगणात नारळाचे रोप लावून करण्यात आला.  

     यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य एडवोकेट भगीरथ शिंदे हे उपस्थित होते. त्याचबरोबर महाविद्यालय विकास समितीचे सदस्य व जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम, सीए कुणाल लाडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. डी. भोर, उपप्राचार्य एस. इ. संदनशीव तसेच शिक्षक वर्ग, विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. 

       महाविद्यालयाच्या स्टाफने प्रत्येक विद्यार्थ्याना वृक्ष सप्रेम भेट दिले असून त्याचे वृक्षारोपण संवर्धन व देखभाल त्या विद्यार्थ्यांनी करावयाचे आहे. सदरचे वृक्ष आपल्या घराजवळ रोपण करून पालकांसोबत सेल्फी काढून झाडाची प्रोग्रेस महाविद्यालयाला व्हाट्सअप वर कळवायचे आहे. तसेच या झाडांना क्यू आर कोड देऊन त्या संदर्भातील माहिती संकलित करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने ६०० विद्यार्थ्यांना केशर आंबा रोपांचे वाटप केलेले आहे.  या कार्यक्रमासाठी वनविभागाचे वनाधिकारी निकम यांनी देखील दीडशे काजूची रोपे महाविद्यालयास स्वतःच्या खर्चातून दिलेली आहेत.  महाविद्यालयाने महाविद्यालय परिसरात व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या घरात वृक्ष संवर्धनाची चळवळ जावी या उद्देशाने हा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. या उपक्रमाचे  रामशेठ ठाकूर, ऍड. भगीरथ शिंदे यांनी कौतुक करून या योजनेला शुभेच्छा दिल्या आहेत. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

भारतीय रेल्वेप्रमाणे बोनस देण्याची कोकण रेल्वे कर्मचाऱ्यांची मागणी