मच्छीमार बांधवांचे प्रश्न मार्गी लावू - चंदू पाटील

 


नवी मुंबई ः मच्छीमार सुध्दा एक प्रकारे शेतकरीच असून देशाच्या विकासात त्याचे महत्वाचे योगदान आहे. परंतु, आजतागायत मचछीमार दुर्लक्षिला गेल्याने तो विविध समस्यांनी ग्रासला आहे. आज त्याला कुणीही वाली उरला नाही. मच्छीमार बांधव येथील खरा भूमीपुत्र असून मच्छीमारांना भेडसावणाऱ्या समस्या लवकरात लवकर मार्गी लावणे गरजेचे आहे. त्याकरिता शासन दरबारी सर्वतोपरी प्रयत्न करु, अशी ग्वाही ‘राष्ट्रवादी काँग्रेस मच्छीमार सेल'चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंदू पाटील यांनी ऐरोली येथे केले.

ऐरोली येथे ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मच्छीमार सेल'ची सभा ‘मच्छीमार सेल'चे प्रदेशाध्यक्ष चंदू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.  यावेळी ते बोलत होते. या सभेस ‘मच्छीमार सेल'चे प्रदेश उपाध्यक्ष आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी महाराष्ट्रात समुद्र किनारी जे विनाशकारी व घातक प्रकल्प येत आहेत. त्यामुळे मच्छिमार कोळी समाजाचे होत असलेले अतोनात नुकसान, मुंबई जिल्हा, उपजिल्हा आणि कोकण किनारपट्टीवर असेल्या मच्छी मार्केटची दुरवस्था, तेथील सुख-सोईंचा अभाव, मच्छी विक्री करणाऱ्या महिलांना मच्छी विक्रीचे परवाने आणि ओळखपत्र मिळणे, कोस्टल रोड आणि कोस्टल प्रकल्पामुळे मच्छीमार कोळी समाजाचे नुकसान, यास्तव नुकसान भरपाई मिळणे याबरोबरच पक्ष बळकटी तसेच होऊ घातलेल्या ग्रामपंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका निवडणुका आदि विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

सदर सभाप्रसंगी ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मच्छीमार सेल'चे प्रदेश उपाध्यक्ष प्रदीप टपके, डॉ. रुपेश कोळी, मुंबई प्रदेश अध्यक्ष विजय वरळीकर, जिल्हा उपाध्यक्ष मंगेश कोळी, पनवेल तालुका अध्यक्ष नंदिनी भोईर, पालघर जिल्हाध्यक्ष संगीता फाटक, पनवेल शहर अध्यक्ष अरुण परदेशी, पेण तालुका अध्यक्ष बिपीन पाटील, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष राहुल म्हात्रे तसेच ‘मच्छीमार सेल'चे इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 ‘ऑल इंडिया बंजारा सेवा संघ'तर्फे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा सत्कार