अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नरेंद्र पाटील यांची निवड

नवी मुंबई : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नरेंद्र पाटील यांची निवड करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अण्णासाहेब पाटील यांच्या ८९ व्या जयंतीनिमित्त  आयोजित मेळाव्यात केली होती. त्याचे अधिकृत शासन अध्यादेश सोमवार दिनांक १७ ऑक्टोबर रोजी पारीत केले. त्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर हा आदेश आल्याने समस्थ माथाडी कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नरेंद्र पाटील यांची निवड करण्यात आल्याची घोषणा केली होती.

या घोषणेनंतर उपस्थित माथाडी वर्गाने घोषणाबाजी करून सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले होते. या महामंडळाच्या अध्यक्षपदी मविआ सरकारच्या पूर्वी सत्तेत असणाऱ्या शिवसेना-भाजप युतीने आमदार नरेंद्र पाटील यांची निवड केली होती. मात्र त्यानंतर मागील अडीच वर्षांत सरकारने महामंडळाच्या नियुक्त्या केल्या नव्हत्या. राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर सत्तेवर विराजमान झालेल्या फडणवीस आणि शिंदे सरकारने महामंडळांच्या अध्यक्षपदी नरेंद्र पाटील यांची फेरनियुक्ती करून निवडणुकीच्या तोंडावर माथाडींना आपल्यासोबत घेण्याचा प्रयत्न केला आहे. माथाडी कामगारांचे अनेक रखडलेले प्रश्न पुढील काळात मार्गी लावण्यात येतील. दिवंगत अण्णासाहेब पाटील महामंडळ व सारथी संस्थेच्या माध्यमातून मराठा समाजात नवीन उद्योजक तयार होण्यासाठी अनेक योजनांवर राज्य शासन काम करत आहे.त्यामुळे महामंडळाची जबाबदारी पुन्हा एकदा माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांच्यावर सोपविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहिर केले होते आणि त्यानुसार अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नरेंद्र पाटील यांची निवड केल्या बाबतचे अधिकृत शासन अध्यादेश सोमवार दिनांक १७ ऑक्टोबर रोजी काढण्यात आला आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

वाहतूक कोंडीवर तोडगा ; कोपरखैरणे सेक्टर २२ आणि २३ मधील उजव्या रस्त्यावर नो पार्किंग झोन घोषित