कोकण विभागीय आयुक्तांकडे ना एकही हरकत

वाशी ः ठाणे तालुक्यातील १४ गावांचा समावेश नवी मुंबई महापालिकेमध्ये करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला होता. यासाठी १२ सप्टेंबर २०२२ रोजी अधिसूचना जारी करुन १ महिन्यात हरकती आक्षेप नोंदवण्यासाठी मुदत देण्यात आली होती. मात्र, या एक महिन्यात कोकण विभागीय आयुक्त (महसूल) यांच्याकडे एकही हरकत न आल्याने या १४ गावांचा नवी मुंबई महापालिका मध्ये समावेश होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

ठाणे महापालिका लगतच्या १४ गावांना नवी मुंबई महापालिका मध्ये समाविष्ट करण्यासाठी येथील गावकऱ्यांनी तत्कालीन राज्याचे नगरविकास मंत्री तथा विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे १४ गावांच्या विकासाचा प्रश्न मांडला होता. तसेच विधानसभा अधिवेशनात पुन्हा एकदा सदर १४ गावांचा नवी मुंबई महापालिका मध्ये समावेश करण्याचा मुद्दा आमदार प्रमोद पाटील, डॉ. बालाजी किणीकर, गणेश नाईक, रविंद्र चव्हाण यांनी मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन ठाणे महापालिका लगतची १४ गावे नवी मुंबई महापालिका मध्ये समाविष्ट करण्याची घोषणा २४ मार्च रोजी केली होती. त्यानंतर ठाणे महापालिका लगतची १४ गावे नवी मुंबई मध्ये समाविष्ट करायला नगरविकास विभागाने मंजुरी दिली असून, तशी घोषणा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली होती. अखेर १४ गावांचा नवी मुंबई मध्ये समाविष्ट करण्याचा प्रश्न मार्गी लावत यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार नगरविकास विभागाने प्राथमिक अधिसूचना १२ सप्टेंबर २०२२ रोजी जाहीर केली होती. त्यावर १ महिन्यात हरकती आक्षेप नोंदवण्यासाठी मुदत देण्यात आली होती. मात्र, या एक महिन्यात कोकण विभागीय आयुक्त (महसूल) नगरपालिका विभाग यांच्याकडे एकही हरकत आली नाही, अशी माहिती कोकण विभागीय आयुवत कार्यालयातून देण्यात आली आहे. त्यामुळे ठाणे महापालिका लगतच्या १४ गावांचा नवी मुंबई मध्ये समावेश होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे ठाणे महापालिका लगतच्या १४ गावांना मोठा दिलासा मिळाला असून, या १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून सुनियोजितपणे विकास करणे शक्य होणार आहे.

ठाणे जिल्ह्यातील दहिसर, मोकाशी, वालीवली, पिंपरी, निघू, नावाळी, वाकळण, बामाली, नारीवली, बाळे, नागाव, भंडार्ली, उत्तरशीव आणि गोटेघर आदी १४ गावे सुरुवातीला नवी मुंबई महापालिकेत होती. वाढीव मालमत्ता कराच्या मुद्द्यावर ती नवी मुंबई महापालिकेतून वगळावीत यासाठी ग्रामस्थ आक्रमक झाले होते. नवी मुंबई महापालिका मधून सदर १४ गावे वगळण्याचा वाद इतका टोकाला गेला होता की गावातून निवडणूक अर्ज दाखल करणाऱ्या दोघा उमेदवारांची घरे जाळण्यात आली होती. अखेर तत्कालीन काँग्रेस सरकारने नवी मुंबई महापालिका मधून सदर १४ गावे वगळली. या काळात कोणतेही ठोस नियोजन प्राधिकरण नसल्याने या १४ गावांचा विकास रखडला होता. त्यामुळे ठाणे महापालिका लगतची १४ गावे पुन्हा नवी मुंबई महापालिका मध्ये समाविष्ट करण्याची मागणी जोर धरु लागली. अखेर शासनाने सदर मागणी मान्य करत सदर १४ गावे नवी मुंबई मध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

शहर सुशोभिकरणावर भर देण्याचे महापालिका आयुवतांचे निर्देश