नवी मुंबईत सुरक्षेचा जागर
जागतिक आपत्ती धोके निवारण दिनानिमित्त नवी मुंबईत सुरक्षेचा जागर
नवी मुंबई ः कोणतीही आपत्ती सांगून येत नाही. मात्र, आपत्ती ओढवलीच तर तातडीने करावयाच्या उपाययोजना तसेच आपत्ती येऊच नये यासाठी घ्यावयाची खबरदारी याबाबत प्रत्येकाला माहिती असणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने जागतिक आपत्ती धोके निवारण दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महापालिका मुख्यालयासह महापालिका क्षेत्रात विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या मॉकड्रीलला चांगला प्रतिसाद लाभला असून या माध्यमातून नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण होत असल्याबद्दल अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी समाधान व्यक्त केले.
जागतिक आपत्ती धोके निवारण दिन निमित्त महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यालयातील ॲम्पीथिएटर मध्ये आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने, अग्निशमन विभागाच्या सहयोगाने आयोजित विशेष
जनजागृतीपर उपक्रमात सुजाता ढोले आपले मनोगत व्यक्त करित होत्या. याप्रसंगी आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त मंगला माळवे, अतिरिक्त शहर अभियंता तथा अग्निशमन विभागप्रमुख शिरीष आरदवाड, कार्यकारी अभियंता मदन वाघचौडे, शुभांगी दोडे, सुनिल लाड, मनोहर सोनावणे, अग्निशमन अधिकारी पुरुषोत्तम जाधव तसेच अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. एखाद्या आपत्तीची खबर मिळाल्यानंतर त्याठिकाणी पोहोचून कार्यवाही सुरु करण्याचा महापालिका अग्निशमन विभागाचा रिस्पॉन्स टाईम सरासरी एक ते दीड मिनिट इतका असून नवी मुंबईच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असणारे कर्तव्यदक्ष अधिकारी, कर्मचारी हीच अग्निशमन दलाची ओळख आहे. अग्निशमन दलाला कमीत कमी काम करावे लागावे म्हणजेच नवी मुंबई शहर आपत्तीविना सुरक्षित रहावे अशी आपल्या सर्व नागरिकांची जबाबदारी असून प्रात्यक्षिकात सांगितलेल्या छोट्या-छोट्या गोष्टींचे अनुकरण सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी यावेळी नमूद केले.
यावेळी सहाय्यक केंद्र अधिकारी देविदास देशमुख यांनी आगीच्या विविध प्रकारांची माहिती देतानाच आग लागू नये म्हणून घ्यावयाची खबरदारी सविस्तरपणे सांगितली. आग लागल्यानंतर काय काळजी घ्यावी आणि कोणत्या
उपाययोजना कराव्यात याविषयी देखील देशमुख यांनी विस्तृत माहिती दिली. सीबीडी-बेलापूर अग्निशमन केंद्र अधिकरी जे. टी. पाटील यांनी आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर फराळ करताना तसेच फटाके उडविताना घ्यावयाची
खबरदारी याबाबत माहिती सांगितली. याप्रसंगी आग, पूर, भूकंप, वादळ, रासायनिक आणि औद्योगिक आपत्ती याविषयीच्या माहितीपटांचे प्रक्षेपण करण्यात आले. त्याचप्रमाणे महापालिका मुख्यालयाच्या आवारात आग विझविण्यासंबंधी प्रत्यक्षिके करण्यात आली.
जागतिक आपत्ती धोके निवारण दिनाचे औचित्य साधून महापालिका मुख्यालयाप्रमाणेच महापालिका शाळा क्र. ४ सीबीडी- बेलापूर, सीवुडस् ग्रँड सेंट्रल मॉल, हॉटेल तुंगा-वाशी, ऐरोली डी-मार्ट, जुई शेरनिटी सोसायटी सेक्टर-८ घणसोली अशा विविध ठिकाणी अग्निशमन विभागामार्फत मॉक ड्रीलचे आयोजन करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांमध्ये संस्कारक्षम वयात आपत्ती निवारणाविषयी जागरुकता निर्माण करण्याकरिता विविध उपक्रम राबविण्याच्या सूचना यावेळी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी दिल्या.