यंदा दिवाळीच्या अनुषंगाने सुका मेवा मागणी वाढली ; दरात दिवसेंदिवस वाढ

दिवाळीच्या तोंडावर सुका मेवा महागला 

नवी मुंबई -: बाजारात जीवनावश्यक वस्तंच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत चालल्याने गृहणींचे किचनचे बजेट कोलमडत चालले आहे. त्यात दीपावलीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे आणि या सणात सुक्या मेव्याची मागणी आता वाढत असून एेन दिवाळी सणात सुक मेवा महागला आहे. खारीक आणि पिस्ता प्रतिकिलो १०० रुपयांनी महागला असून मनुका ही वधारला आहे. 

दिवाळीसणात मोठ्या प्रमाणात फराळ तयार केले जाते. त्यासाठी सुका मेवा लागतो. तसेच बाजारात तयार मिठाई देखील मोठ्या प्रमाणात बनवली जाते. यामुळे फराळ आणि  बाजारातील मिठाईमध्ये प्रामुख्याने काजू, बदाम, पिस्ता, किसमिस आणि खारकेचा अशा सुक्या मेव्याचा वापर केला जातो  

त्यामुळे दिवाळीच्या अनुषंगाने सुका मेवा मागणी वाढली असल्याने दर वाढले आहेत.त्यामुळे यंदा सुका मेवा खरेदी करताना ग्राहकांच्या खिशाला कात्री बसणार असून गृहिणींना ही हात आखडता घ्यावा लागणार आहे. सुक्या मेव्यातील मनुका, पिस्ता आणि खारीक या पदार्थाच्या दरात  वाढ झाली आहे. बदाम, काजूचे दर स्थिर आहेत मात्र पिस्ता आणि खारीकेच्या दरात प्रतिकिलो मागे  १०० रुपयांनी महाग झाले आहे. तर मनुक्याच्या दरात  १० ते २० रुपयांनी वाढ झाली असून  २५०-६५० रुपयांनी उपलब्ध आहे.  पिस्ता आधी ९५० ते १००० रुपये होता ते आता  १००० ते  ११०० रुपयांनी उपलब्ध आहे. तर १५०-२५० रुपयांनी मिळणारी खारीक आता २५० ते ३५० रुपयांनी विक्री होत आहे. तर दिवाळीत बरेच जण हा सुका मेवा आपल्या आप्तेष्टांना तर शासकीय, खासगी कंपन्या आपल्या कर्मचारी वर्गाला भेट म्हणून देतात. परंतू करोनाच्या दोन वर्षाच्या कालावधीत सुका मेवा भेटवस्तू देण्यात आलेली नव्हती. मात्र यंदा दिवाळीच्या अनुषंगाने सुका मेवा मागणी वाढली आहे त्यामुळे दर वाढ झाली असल्याचे मत व्यापाऱ्यांनी  व्यक्त केले आहे. 

तेल तुपाच्या दरात ही वाढ

दिवाळीमध्ये घरा घरात फराळ बनवण्यासाठी लागणाऱ्या तेलाबरोबरच साजूक तुपाचाही मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. रव्याचे, बेसनाचे लाडू, शंकरपाळी इत्यादी गोड पदार्थांसाठी  गृहिणी  तूपाचा वापर करतात.यंदा तुपाच्या दरातही वाढ झाली असून. तुपामध्ये  ५० ते ७० रुपयांची तर तेलाच्या दरात  किलोमागे ५ ते ६ रुपयांची दरवाढ झालेली आहे. तेल प्रतिकिलो १५०-१६०रुपये तर पामतेल १०० रुपयांवरुन आता १०५ रुपयांनी उपलब्ध आहे.  गोवर्धन साजूक तूप ५६० रुपयांनी उपलब्ध होते ते आता ६२० रुपयांनी विक्री होत आहे. तर अमूल तूप ५०० रु होते आता ५५०-५७५रुपये आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरील पुस्तके भेट