‘नॅटकनेक्ट फाऊंडेशन'ला खारफुटी अभियानासाठी युएस पुरस्कार
नवी मुंबई ः यूएस स्थिर ग्लोबी अवॉर्ड्स, जगातील प्रीमियर व्यवसाय पुरस्कार सोहळ्यांचे आणि बिझनेस रँकींग लिस्टच्या आयोजकांनी ‘नॅटकनेक्ट फाऊंडेशन'ला १२व्या बिझनेस एक्सलन्स अवॉर्डस् मध्ये विजेता घोषित केले आहे.
सलग दुसऱ्या वर्षी ‘नॅटकनेक्ट फाऊंडेशन'ने ग्लोबी सिरीज पुरस्कार जिंकला आहे. ‘नॅटकनेक्ट फाऊंडेशन'ला पुन्हा यावर्षी देखील शासकीय सार्वजनिक क्षेत्र किंवा नॉन प्रॉफिट क्षेत्रात ऑर्गनायजेशन ऑफ द इयरच्या अंतर्गत सिल्व्हर अवॉर्ड मिळाले आहे.
सदर पुरस्कार म्हणजे आमच्या टीमच्या सेवांना मिळालेली मान्यता आहे, असे ‘नॅटकनेक्ट फाऊंडेशन'चे संचालक बी. एन. कुमार यांनी सांगितले. ‘श्री एकवीरा आई प्रतिष्ठान'चे अध्यक्ष नंदकुमार पवार यांना पलेमिंगो सिटीसाठी तसेच शासनाच्या मालकीच्या भूखंडातील (जेएनपीटी) खारफुटींना वाचवण्यासाठी पुरस्कृत करण्यात आले आहे.
ग्लोबी बिझनेस एक्सलन्स अवॉर्डस् द्वारे या महान उद्योगात आणि सहयोगींमध्ये विजेता म्हणून घोषित होणे अतिशय सन्मानाची बाब आहे, असे बी. एन. कुमार यांनी नमूद केले. यामुळे खारफुटीच्या ऱ्हासाचा सतत मागोवा घेण्यात आणि संस्थांना काम करायला लावण्यामध्ये आम्हाला नेहमी सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या आव्हानांमधून यशस्वीपणे पार पडण्याच्या आमच्या टीमच्या प्रयत्नांची यामुळे दखल घेण्यात आली आहे, असे कुमार म्हणाले.
‘नॅटकनेक्ट फाऊंडेशन'ने मुख्यमंत्र्यांना लेखी स्वरुपात कळवून एका वर्षापूर्वी मुंबईसाठी पलेमिंगो सिटी असे शिर्षक मिळवण्याच्या दृष्टीने चळवळ सुरु केली होती. सदर संकल्पना नवी मुंबई महापालिकेने अंमलात आणत, ‘स्वच्छ भारत अभियान' अंतर्गत शहराला पलेमिंगो सिटी नाव देण्याविषयी केंद्र सरकारला देखील विनंती केली होती.
दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाचे राज्यातील खारफुटींना वाचवण्याबद्दल आदेश जारी करुन देखील ‘जेएनपीटी'ने आधी वन विभागाला जतनासाठी खारफुटी सुपूर्द केल्या नव्हत्या. ‘जेएनपीटी'ने आपल्या हद्दी अंतर्गत खारफुटी असण्याच्या गोष्टीला देखील नकार दिला होता. पण, ‘नॅटकनेक्ट फाऊंडेशन'च्या आरटीआय माध्यमाने केलेल्या अथक प्रयत्नांमुळेच देशाच्या सर्वात मोठ्या कंटेनर बंदराला अखेरीस त्यांच्याकडे ९१३ हेक्टर समुद्री वनस्पती असल्याची कबुली द्यावी लागली. अखेर ‘जेएनपीटी'ने ८१४ हेक्टर खारफुटी स्थानांतरीत केल्या असून, उर्वरीत अजूनही त्यांच्या अधिकाराअंतर्गत आहेत.